पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका क्रिकेट सामन्यादरम्यान, मैदानातच मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट बाजौर जिल्ह्यामधील खार तालुक्यातील कौसर क्रिकेट मैदानात झाला.
नियोजनबद्ध पद्धतीने ठरवून करण्यात आला स्फोट... -डॉन ने दिलेल्या वृत्तानुसार, बाजौर जिला पुलीस अधिकारी वकास रफीक म्हणाले, हा स्फोट आयईडीच्या माध्यमाने करण्यात आला. त्यांच्या मते, हा स्फोट ठरवून करण्यात आला असून त्यासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आले होते. मात्र अद्याप कुठल्याही दहशतवादी समूहाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले -अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून, मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावरही क्वाडकॉप्टरने आणखी एक हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्रतो अयशस्वी झाला, असेहीसंबंधित अधिकाऱ्याने सांगितले.