आर्थिक चणचण, पॅरिसमध्ये ‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावत रस्त्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 18:40 IST2018-01-11T18:37:03+5:302018-01-11T18:40:35+5:30

बॉलिवूडची हॉटेस्ट गर्ल, अभिनेत्री मल्लिका शेरावत आर्थिक चणचणीमुळे रस्त्यावर आली आहे. भाडे थकविल्यामुळे फ्रेंच कोर्टाने मल्लिकाला पॅरिस येथील घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

bollywood star mallika sherawat evicted from paris flat over unpaid rent | आर्थिक चणचण, पॅरिसमध्ये ‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावत रस्त्यावर 

आर्थिक चणचण, पॅरिसमध्ये ‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावत रस्त्यावर 

पॅरीस - बॉलिवूडची हॉटेस्ट गर्ल, अभिनेत्री मल्लिका शेरावत आर्थिक चणचणीमुळे रस्त्यावर आली आहे. भाडे थकविल्यामुळे फ्रेंच कोर्टाने मल्लिकाला पॅरिस येथील घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मल्लिकाला आता नवे घर शोधावे लागणार आहे. मल्लिका आणि तिचा फ्रेंच बॉयफ्रेन्ड साइरिल ऑक्जेनफेन्स या दोघांना घर भाडे न दिल्याने पॅरिसमध्ये बेघर व्हावे लागले आहे. मल्लिका तिचा बॉयफ्रेंड सायरिल ऑक्सनफँससोबत पॅरिसच्या १६, एरांडिस्मेंट अपार्टमेंटमध्ये राहते. या भागात ‘थंडरबाल’ व ‘लास्ट टेंगो’ या सारख्या चित्रपटांचे शूटींग झाले आहे. मल्लिका दीर्घकाळापासून साइरिलसोबत राहत आहेत. या दोघांनीही सीक्रेट मॅरेज केल्याची चर्चा मध्यंतरी होती.  अर्थात मल्लिकाने या सगळ्या चर्चा अफवा असल्याचे सांगत अफवा पसरवणे बंद करा, असे म्हटले होते. ज्यादिवशी मी लग्न करेल, त्यादिवशी मी सर्वांना निमंत्रित करेल, असेही तिने स्पष्ट केले होते.

तिच्यावर घराच्या भाड्यापोटीचे 64 लाख रुपये थकविल्याचा आरोप आहे. हे दोघंही जानेवारी 2017 पासून येथे राहतात. भाडे थकविल्यामुळे घरमालकाने कोर्टात धाव घेऊन मल्लिकाला घरातून बाहेर काढण्याची मागणी केली होती. 'मल्लिकाने कधीच वेळेवर भाडे दिले नाही. घराचं भाडं महिन्याला 4 लाख 60 हजार 946 रुपये असताना तिने आतापर्यंत केवळ 2 लाख 6 हजार717 रुपयेच भरले आहेत,  असा दावा घरमालकाने केला होता. याप्रकरणी कोर्टाने 14 डिसेंबर रोजी मल्लिकाला नोटीसही पाठवली होती. त्यात दोघांना थकविलेले भाडे भरण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या दोघांनी या नोटीशीला काहीच उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे कोर्टाने अखेर त्यांना घर खाली करण्याचे आदेश दिले.
 
मल्लिका शेरावत दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर्टी पॉलिटीक्स’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. यानंतर 2016 मध्ये ‘टाइम राइडर्स’ या चीनी चित्रपटात ती झळकली होती.  ‘मर्डर गर्ल’ नावाने प्रसिद्ध झालेली मल्लिका ‘मर्डर’,‘किस किस की किस्मत’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’,‘गुरू’,‘हिस्स’ अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत दिसलेली आहे. ‘द मिथ’ या विदेशी चित्रपटात जॅकी चॅनसोबत तिने काम केले आहे.

Web Title: bollywood star mallika sherawat evicted from paris flat over unpaid rent