Bolivia Bus Crash : भीषण अपघात! बोलिव्हियामध्ये २ बसची जोरदार धडक; ३७ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 08:49 IST2025-03-02T08:49:15+5:302025-03-02T08:49:45+5:30
Bolivia Bus Crash : बोलिव्हियामध्ये भीषण अपघात झाला आहे. दोन बसची जोरदार धडक झाल्याने ३७ जणांचा मृत्यू झाला आणि ३० हून अधिक जण जखमी झाले.

फोटो - रॉयटर्स
बोलिव्हियामध्ये भीषण अपघात झाला आहे. दोन बसची जोरदार धडक झाल्याने ३७ जणांचा मृत्यू झाला आणि ३० हून अधिक जण जखमी झाले. दोन प्रवासी बस समोरासमोर आदळल्याने हा अपघात झाला. उयुनी आणि कोलचानी दरम्यानच्या महामार्गावर पहाटेच्या सुमारास एक बस चुकीच्या लेनमध्ये गेल्याने हा अपघात झाला. अलिकडच्या काळात घडलेल्या सर्वात भयंकर अपघातांपैकी हा एक अपघात ठरला आहे.
या अपघातात, ३९ लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उयुनी शहरातील चार रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ३७ लोकांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोटोसी विभागीय पोलीस कमांडच्या प्रवक्त्याने पत्रकारांना दिली आहे. अपघातात सहभागी असलेल्या बसपैकी एक बस ओरुरो शहराकडे जात होती, जिथे वीकेंड ओरुरो कार्निव्हल आयोजित केला जात होता. हे फेस्टिव्हल लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठ्या फेस्टिव्हलपैकी एक आहे आणि हजारो लोक त्यात सहभागी होतात.
पोलीस आणि बचाव कार्य
अपघातस्थळी क्रेनच्या मदतीने रस्त्यावर उलटलेली बस बाजुला करण्यात आली आहे. घटनास्थळावरून मृतदेह काढले जात आहेत. मृतांची ओळख पटवण्याचं आणि जखमींना मदत करण्याचं काम करत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
जास्त वेग अपघाताचं कारण
बोलिव्हिया सरकारच्या मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, अपघाताचं एक प्रमुख कारण जास्त वेग असू शकतो. एक बस विरुद्ध लेनमध्ये गेली होती, ज्यामुळे हा अपघात झाला असं सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे जेणेकरून अपघाताचं खरं कारण कळू शकेल आणि मृतांच्या कुटुंबियांना मदत करता येईल.