मोसुलमध्ये बोट दुर्घटना; 19 मुलांसह 94 जणांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 13:27 IST2019-03-22T13:26:28+5:302019-03-22T13:27:04+5:30
या दुर्घटनेमुळे पंतप्रधान अदेल अब्देल महदी यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

मोसुलमध्ये बोट दुर्घटना; 19 मुलांसह 94 जणांचा बुडून मृत्यू
बगदाद : इराकच्या मोसुल भागात एका नदीमध्ये होडी उलटल्याने 94 जण ठार झाले असून यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. कुर्दिश समाजाचे हे लोक नौरौज या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जात होते. या दुर्घटनेमुळे पंतप्रधान अदेल अब्देल महदी यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.
जगभरात होडीमध्ये क्षमतेपेक्षाही जादा प्रवासी भरल्याने बुडाल्याच्या घटना घडत आहेत. गुरुवारी दजला नदीकाठाच्या बाजुला राहणारे कुर्दिश समाजाचे लोक नव वर्षाच्या स्वागतासाठी जात होते. मात्र, त्यांची होडी नदीच्या मध्यभागी कलंडल्याने 94 जणांचा बुडून मृत्यू झाला. तर 55 जणांना वाचविण्यात यश आले आहे. मृतांमध्ये 19 बालके आणि 61 महिलांचा समावेश आहे.
इराकवर गेल्या दशकभरापासून आयएसआयएससारख्या दहशतवादी संघटनांचा ताबा होता. यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर लोकांना मारले जात होते. मात्र, होडी बुडून मृत्यू झाल्याच्या घटना कमीच होत्या. या घटनेमुळे देशाला मोठा हादरा बसला आहे.
पंतप्रधान अदेल यांच्या म्हणण्यानुसार या दुर्घटनेची कल्पना कोणी करू शकत नाही. एक व्यक्ती पोहत किनाऱ्यावर आला. होडीमध्ये महिलांसह मुलांची संख्या मोठी होती. यामुळे मृतांचा आकडा वाढला. मोसुलच्या सुरक्षा अधिकार्यांनी सांगितल्यानुार होडीमध्ये 100 हून अधिक लोक प्रवास करत होते. क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती घेतल्याने ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेमुळे इराकच्या न्यायिक यंत्रणांनी 9 फेरी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब ताब्यात घेण्याच आदेश दिले आहेत. तसेच नौकांच्या मालकांना देशाबाहेर जाण्यास प्रतिबंध घातला आहे. नुकतीच सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांना जोरदार पाऊस आणि मोसुल धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच नदीच्या प्रवाहाचा वेगही वाढणार असल्याचे म्हटले होते. मात्र, या कंपन्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्य़ात येत आहे.
अद्याप अनेकजण बेपत्ता असून त्यांच्या मृतदेहांचा शोध घेण्य़ात येत आहे.