समुद्रात बोट उलटल्याने ६८ स्थलांतरितांचा मृत्यू, ७४ बेपत्ता; किनाऱ्यावर विखुरले होते मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 09:20 IST2025-08-04T09:19:10+5:302025-08-04T09:20:35+5:30
येमेनमध्ये स्थलांतरितांची बोट उलटल्याने ६८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

समुद्रात बोट उलटल्याने ६८ स्थलांतरितांचा मृत्यू, ७४ बेपत्ता; किनाऱ्यावर विखुरले होते मृतदेह
Yemen Boat Tragedy: रविवारी येमेनच्या अबयान किनाऱ्याजवळ मोठी बोट दुर्घटना घडली. येमेनमधील एडनच्या आखातात एक बोट उलटल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या अपघातात आतापर्यंत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ७४ जण बेपत्ता आहेत. या बोटीत १५४ इथिओपियातील स्थलांतरित होते आखाती देशांमध्ये जात होते. या घटनेनंतर खानफार जिल्ह्यात ५४ मृतदेह किनाऱ्यावर वाहून आले आहेत, तर १४ मृतदेह जिंजीबार शहरातील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातातून फक्त १२ जण वाचले आहेत, बाकीचे बेपत्ता आहेत.
येमेनच्या अबयान प्रांताच्या किनाऱ्याजवळ रविवारी १५४ स्थलांतरितांनी भरलेली एक बोट बुडाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीतील सर्व स्थलांतरित इथिओपियाचे होते, जे येमेनमार्गे सौदी अरेबियामध्ये रोजगाराच्या शोधात निघाले होते. रविवारी पहाटे एडेनच्या आखातात ही बोट उलटली. अपघातानंतर आतापर्यंत फक्त १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे, ज्यात नऊ इथिओपियन आणि एका येमेनी नागरिकाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने ही घटना अलिकडच्या काळात घडलेल्या सर्वात वाईट दुर्घटनांपैकी एक असल्याचे म्हटलं.
अबयान सुरक्षा संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर मोठ्या प्रमाणात शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली. किनाऱ्याच्या वेगवेगळ्या भागात मृतदेह विखुरलेले आढळले, ज्यामुळे बचाव कार्य अधिक कठीण झाले. स्थानिक प्रशासन आणि मदत पथके सतत शोध कार्यात गुंतलेली आहेत. बचाव कर्मचारी मृतदेह आणि वाचलेल्यांचा शोध घेत आहेत.
इथिओपिया आणि सोमालियासारख्या देशांमध्ये गरिबी आणि बेरोजगारीमुळे लोकांना जीवघेणा समुद्री प्रवास करावा लागतो. येमेनमध्ये गेल्या दशकाहून अधिक काळ गृहयुद्ध सुरू आहे, तरीही स्थलांतरितांसाठी आखाती देशांमध्ये पोहोचण्याचा हा एक प्रमुख मार्ग आहे. मानवी तस्करी करणाऱ्यांकडून चालवल्या जाणाऱ्या गर्दीने भरलेल्या बोटींमध्ये स्थलांतरित अनेकदा धोकादायक समुद्री प्रवास करतात. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या मते, २०२४ मध्ये आतापर्यंत ६०,००० हून अधिक स्थलांतरितांनी येमेनमधून प्रवास केला आहे. तर २०२३ मध्ये ही संख्या ९७,२०० होती. समुद्री मार्गांवर वाढवलेल्या सुरक्षेमुळे यामध्ये घट झाली आहे.