परराष्ट्र मंत्रालयात चीनी अधिकाऱ्यांसोबत तालिबानची बैठक सुरू असतानाच झाला बॉम्बस्फोट, २० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 19:47 IST2023-01-11T19:46:41+5:302023-01-11T19:47:38+5:30
अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयात चीनी अधिकाऱ्यांसोबत तालिबानची बैठक सुरू असतानाच झाला बॉम्बस्फोट, २० जणांचा मृत्यू
काबूल-
अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यात बॉम्बस्फोटात २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार बॉम्बस्फोटावेळी तालिबान आणि चीनी अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक सुरू होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच एका आत्मघाती हल्लेखोरानं विस्फोट घडवून आणळा यात २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
काबुल पोलीसांचे प्रवक्ते खालिद जादरान यांनीही स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुरक्षादल घटनास्थळी तातडीनं पोहोचल्याचीही माहिती त्यांनी दिली. याआधी १ जानेवारी रोजी काबूलच्या सैन्य हवाई दलाच्या एका चेकपोस्टजवळ बॉम्बस्फोट झाला होता. यात अनेक लोक मारले गेले होते. तालिबाननं २०२१ मध्ये अफगाणिस्तानात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर इस्लामिक स्टेटनं हल्ले वाढवले आहेत.
सैन्य हवाई दलाचे ठिकाण नागरी हवाई तळापासून अवघ्या २०० मीटरवर आहे. तसंच गृहमंत्रालय देखील जवळच आहे. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी टाकोर यांनीही स्फोटात अनेक लोक मारले गेल्याचं म्हटलं आहे. तसंच काही लोक जखमी देखील झाले आहेत. मृतांचा अधिकृत आकडा मात्र अद्याप कळू शकलेला नाही.