बीएलएच्या हल्ल्यांनी पाकिस्तानी सैन्य हादरले, हजारो सैनिकांनी लष्करप्रमुखांकडे राजीनामे पाठवले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:21 IST2025-03-17T14:21:09+5:302025-03-17T14:21:39+5:30
Pakistan Army News: बीएलएकडून एका पाठोपाठ एक होत असलेल्या भयंकर हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्य हादरलं असून, सैनिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या हल्ल्यांनंतर मागच्या काही दिवसांत सुमारे दोन हजार ५०० सैनिकांनी सैन्यातील नोकरीचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे.

बीएलएच्या हल्ल्यांनी पाकिस्तानी सैन्य हादरले, हजारो सैनिकांनी लष्करप्रमुखांकडे राजीनामे पाठवले?
मागच्या आठवडाभरात पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये बंडखोर बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) दोन मोठे हल्ले घडवून आणले आहेत. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सैन्यातील अनेक सैनिक मारले गेले आहेत. तसेच बीएलएकडून एका पाठोपाठ एक होत असलेल्या भयंकर हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्य हादरलं असून, सैनिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांचा परिणाम पाकिस्तानी सैन्याच्या मनोधैर्यावर होत असून, या हल्ल्यांनंतर मागच्या काही दिवसांत सुमारे दोन हजार ५०० सैनिकांनी सैन्यातील नोकरीचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे.
एका संकेतसस्थळाने विश्वसनीय सूत्रांचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे. पाकिस्तानी सैन्यामध्ये वाढत असलेली असुरक्षितता, सातत्याने सैनिकांचे जात असलेले बळी आणि पाकिस्तानची ढासळत असलेली आर्थिक स्थिती यामुळे पाकिस्तानी सैन्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक पाकिस्तानी सैनिक पाकिस्तानमध्ये आपला जीव धोक्यात घालण्याऐवजी सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि संयक्त अरब अमिरातीमध्ये काम करण्याचा पर्याय निवडत आहे. पाकिस्तानी सैन्यामध्ये चिंताजनक परिस्थिती असून, सातत्याने सुरू असलेला हिंसाचार आणि असुरक्षिततेला सामोरे जाण्यास सैनिक अनुत्सुक आहेत.
पाकिस्तानमध्ये बिघडत असलेलील संरक्षणाची व्यवस्था सैनिकांच्या मन:स्थितीला बिघडवत आहे. तसेच सैनिक सैन्यातून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने पाकिस्तानी सैन्याची ताकद आणि व्यवस्थापनाबाबतची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत झालेलं ट्रेनचं अपहरण आणि काल झालेला आत्मघातकी हल्ला यामुळे पाकिस्तानी सैन्याची चिंता वाढली आहे. या दोन्ही घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सैनिक मारले गेले आहेत. मात्र पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी राजीनाम्यांच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, मागच्या काही काळात बलुचिस्तानमध्ये असंतोष वाढत असल्याने या परिसरातील स्थैर्य बिघडले आहे. जाफर एक्स्प्रेसवरील हल्ल्यानंतर बीएलएने आपल्या कारवायांना अधिकच तीव्र केलं आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याला हादरवण्यासाठी एकापाठोपाठ हल्ले केले जात आहेत.