एच-१बी व्हिसा रद्द करण्यासाठीचे विधेयक अमेरिकी संसदेत सादर होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:43 IST2025-11-15T07:42:59+5:302025-11-15T07:43:15+5:30
H-1B visa: एच-१ व्हिसा पूर्णपणे रद्द करण्यासाठी अमेरिकेच्या एका खासदाराकडून संसदेत विधेयक सादर करण्यात येणार आहे. या व्हिसामुळे मिळणारे अमेरिकन नागरिकत्व रद्द करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे.

एच-१बी व्हिसा रद्द करण्यासाठीचे विधेयक अमेरिकी संसदेत सादर होणार
न्यूयॉर्क : एच-१ व्हिसा पूर्णपणे रद्द करण्यासाठी अमेरिकेच्या एका खासदाराकडून संसदेत विधेयक सादर करण्यात येणार आहे. या व्हिसामुळे मिळणारे अमेरिकन नागरिकत्व रद्द करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. हे विधेयक पारित झाल्यास एच-१बी व्हिसा संपल्यानंतर भारतीय नागरिक तसेच बाहेर देशातून येणाऱ्या लाखो लोकांना त्यांच्या मायदेशी परतावे लागणार आहे. जॉर्जियाचे खासदार मार्जरी टेलर ग्रीन हे संबंधित विधेयक संसदेत मांडणार आहेत. त्यांनी स्वत: शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली.
माझ्या प्रिय अमेरिकन मित्रांनो, एच-१ बी व्हिसा पूर्णपणे रद्द केला जावा यासाठी मी संसदेत एक विधेयक सादर करणार आहे. एच-१ बी व्हिसा या कार्यक्रमामुळे बऱ्याच काळापासून फसवणूक व गैरवापर होत आहे. त्यामुळे अनेक दशकांपासून अमेरिकन कामगारांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागत असल्याचे सोशल मीडियाद्वारे खा. मार्जरी टेलर ग्रीन यांनी स्पष्ट केले.
१० हजार व्हिसाची मर्यादा
अमेरिकन लोकांना जीवनरक्षक सेवा देणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय व्यावसायिकांसाठी दरवर्षी १०,००० व्हिसाची मर्यादा निश्चित करण्याची सूट दिली आहे. मात्र, ही मर्यादादेखील दहा वर्षांनंतर पूर्णपणे रद्द करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
अमेरिकेच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात देशातील विद्यार्थ्यांसाठी जागा वाढवणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. बाहेर देशातील लोकांनी कायमस्वरूपी अमेरिकेत राहण्यासाठी नाही तर विशिष्ट कालावधीसाठी लागणाऱ्या तज्ज्ञांची गरज पूर्ण करण्यासाठी हा व्हिसा सुरू करण्यात आला होता, असा दावा खासदार टेलर ग्रीन केला.
...तर भारतीयांना सर्वाधिक फटका
अमेरिकन संसदेत हे विधेयक पारित झाल्यास भारतीय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सर्वाधिक फटका बसणार आहे. अमेरिकेत प्रत्येक वर्षी ६५ हजार नियमित, तर उच्च पदवी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी २० हजार एच-१ व्हिसा दिले जातात.
भारतीय आयटी क्षेत्रातील व्यावसायिक या व्हिसा श्रेणीत सर्वाधिक आहेत. त्यामुळे संबंधित विधेयक पारित झाल्यास एच-१ बी व्हिसावर अमेरिकेत राहणारे भारतीय व्यावसायिक विशेषकरून आयटी क्षेत्रातील कर्मचारी व डॉक्टरांना सर्वाधिक फटका बसणार आहे. या विधेयकामुळे एच-१ बी व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकत्व मिळवण्याचा मार्गदेखील बंद होणार आहे.