बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन अन्..; एपस्टीन फाइल्समध्ये अनेकांची नावे, भारताशी संबंध?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:42 IST2025-12-21T14:41:40+5:302025-12-21T14:42:16+5:30
‘एपस्टीन फाइल्स’चा पहिला भाग जाहीर; हाय-प्रोफाइल नावे, मात्र...

बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन अन्..; एपस्टीन फाइल्समध्ये अनेकांची नावे, भारताशी संबंध?
Epstein Files : अमेरिकेच्या न्याय विभागाने 19 डिसेंबर रोजी ‘एपस्टीन फाइल्स’चा पहिला भाग सार्वजनिक केला. या दस्तावेजांमध्ये अनेक हाय-प्रोफाइल व्यक्तींची छायाचित्रे समोर आली असली, तरी या टप्प्यात कोणताही थेट गुन्हेगारी पुरावा आढळलेला नाही, असे विभागाने म्हटले आहे. ही केवळ आंशिक रिलीज असून, येत्या आठवड्यांत आणखी हजारो पानांचे दस्तावेज प्रसिद्ध केले जाणार आहेत.
‘एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’ अंतर्गत खुलासा
अटर्नी जनरल पाम बोंडी यांच्या नेतृत्वाखाली DOJ ने हे दस्तावेज ‘एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’ अंतर्गत जाहीर केले आहेत. हा कायदा नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मंजूर केला होता.
या दस्तावेजांमध्ये न्यायालयीन नोंदी, तपासाशी संबंधित ई-मेल्स, फ्लाइट लॉग्स, शेकडो छायाचित्रे आणि 1996 मधील एक FBI तक्रारीचा समावेश आहे. या तक्रारीत जेफ्री एपस्टीनवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले होते. ही तक्रार त्या काळातील आहे, जेव्हा एपस्टीनविरोधात मोठ्या प्रमाणावर चौकशी सुरूही झाली नव्हती.
आधीच सार्वजनिक असलेली किंवा रेडॅक्टेड माहिती
न्याय विभागाने मान्य केले आहे की, या फाइल्समधील मोठा भाग आधीच सार्वजनिक नोंदींमध्ये उपलब्ध होता किंवा मोठ्या प्रमाणावर रेडॅक्ट (माहिती काढून टाकलेली) आहे. यामुळे अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.
‘क्लायंट लिस्ट’ किंवा ब्लॅकमेल फाइल्स नाहीत
या रिलीजमधून एपस्टीनची कथित क्लायंट लिस्ट किंवा ब्लॅकमेल फाइल्स समोर येतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. DOJ ने याआधीच जुलै 2025 मध्ये स्पष्ट केले होते की, अशी कोणतीही प्रमाणित यादी अस्तित्वात नाही.
बिल क्लिंटन कनेक्शनवर चर्चा
या दस्तावेजांमध्ये सर्वाधिक चर्चा माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या छायाचित्रांभोवती फिरत आहे. फाइल्समध्ये एपस्टीन, घिस्लेन मॅक्सवेल आणि बिल क्लिंटन हे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत असल्याची छायाचित्रे आहेत. यामध्ये लंडनमधील विन्स्टन चर्चिल वॉर रूम्स, एक हॉट टब आणि खाजगी विमानातील (प्रायव्हेट जेट) छायाचित्रेदेखील आहेत. मात्र, या छायाचित्रांमधून क्लिंटन यांचा कोणत्याही गुन्हेगारी कृत्याशी थेट संबंध जोडणारा पुरावा नाही, असे न्याय विभागाने स्पष्ट केले आहे.
इतर प्रसिद्ध व्यक्तींची नावे
या फाइल्समध्ये मायकेल जॅक्सन, डायना रॉस, क्रिस टकर, मिक जॅगर आणि रिचर्ड ब्रॅन्सन यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींचीही छायाचित्रे आहेत. मात्र ही सर्व छायाचित्रे सामाजिक कार्यक्रमांतील असून, या व्यक्तींविरोधात कोणताही नवा गुन्हेगारी पुरावा सादर करण्यात आलेला नाही.
भारताशी संबंध नाही
या दस्तावेजांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा उल्लेख अत्यंत मर्यादित आहे. काही जुन्या सार्वजनिक संदर्भांत त्यांचे नाव येते, मात्र कोणतीही नवी छायाचित्रे किंवा गुन्हेगारी लिंक समोर आलेली नाही. विशेष म्हणजे, या 19 डिसेंबरच्या रिलीजमध्ये भारताशी संबंधित कोणताही नवा किंवा महत्त्वाचा दुवा आढळलेला नाही.
पुढील खुलाशांची शक्यता
माहितीनुसार, पीडितांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या आठवड्यांत हजारो पानांचे अतिरिक्त दस्तावेज जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात अधिक गंभीर खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.