नेपाळ निवडणुकीत मोठा उलटफेर! बालेन शाह यांनी माजी पंतप्रधान केपी ओली यांचा केला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 20:30 IST2026-03-07T20:23:19+5:302026-03-07T20:30:25+5:30
३५ वर्षीय बालेन यांना ६८,३४८ मते मिळाली, तर ७४ वर्षीय ओली यांना १८,७३४ मते मिळाली. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळने ओली यांना पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रस्तावित केले होते.

नेपाळ निवडणुकीत मोठा उलटफेर! बालेन शाह यांनी माजी पंतप्रधान केपी ओली यांचा केला पराभव
नेपाळमधील निवडणुकीत मोठा उलटफेर झाल्याचे पाहालायला मिळत आहे. आरएसपी नेते आणि रॅपरमधून राजकारणी बनलेले बालेन शाह यांनी नेपाळच्या झापा-५ मतदारसंघात चार वेळा पंतप्रधान राहिलेले के.पी. शर्मा ओली यांचा सुमारे ५०,००० मतांनी पराभव केला. राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे नेते आणि काठमांडूचे माजी महापौर, ज्यांना फक्त बालेन म्हणून ओळखले जाते, ते त्यांच्या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत.
निवडणूक आयोगाने सांगितले की, ३५ वर्षीय बालेन यांना ६८,३४८ मते मिळाली, तर ७४ वर्षीय ओली यांना १८,७३४ मते मिळाली. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळने ओली यांना पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उभे केले होते. गेल्या वर्षी नेपाळमध्ये झालेल्या हिंसक 'जनरल झेड' निदर्शनांनंतर गुरुवारी झालेली सार्वत्रिक निवडणूक ही पहिलीच होती, यात राजकारणात पिढीजात बदल आणि हिमालयीन देशात भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची मागणी करण्यात आली होती.
बालेन शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला नेपाळमध्ये प्रचंड विजय मिळण्याची शक्यता आहे. शाह यांनी झापा-५ जागेवर ओली यांना आव्हान दिले आणि त्यांचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. या जागेवर एकूण १०६,३७२ मते पडली. देशभरात आरएसपीच्या बाजूने जोरदार लाट असूनही, माजी पंतप्रधान दाहाल यांनी रुकुम पूर्व-१ जागा १०,२४० मतांनी जिंकण्यात यश मिळवले.
आकडेवारीनुसार, आरएसपीने ६० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, नेपाळी काँग्रेसने फक्त नऊ जागा जिंकल्या आहेत. ओलींचा पक्ष, नेपाळ कम्युनिस्ट पक्षने तीन जागा जिंकल्या आहेत आणि नेपाळ कम्युनिस्ट पक्षाने दोन जागा जिंकल्या आहेत. या आकडेवारीनुसार, शहा यांचे पंतप्रधानपद जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
जनरेशन-झी च्या आंदोलनापूर्वी नेपाळमध्ये सत्ता असलेल्या पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष बिष्णू पौडेल, गोकर्ण बिस्ता, सरचिटणीस शंकर पोखरेल, सचिव महेश बसनेट, भानुभक्त ढकाल आणि राजन भट्टाराई यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. नेपाळ संसदेच्या एकूण २७५ जागांसाठी ५ मार्च रोजी मतदान झाले. यापैकी १६५ जागांसाठी थेट मतदानाद्वारे आणि उर्वरित ११० जागांसाठी प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे निवडणुका घेण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या मते, यावेळी सुमारे ६० टक्के मतदान झाले.