नेपाळमध्ये मोठं 'स्कँडल'! पर्यटकांना आजारी पाडून माऊंट एव्हरेस्टवरून रेस्क्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:03 IST2026-04-07T12:03:20+5:302026-04-07T12:03:59+5:30

स्कँडलमधून सुमारे १९.६९ मिलियन डॉलर्स (सुमारे १८८ कोटी रुपये) इतकी फसवणूक करण्यात आली.

Big 'scandal' in Nepal! Tourists get sick and are rescued from Mount Everest! | नेपाळमध्ये मोठं 'स्कँडल'! पर्यटकांना आजारी पाडून माऊंट एव्हरेस्टवरून रेस्क्यू!

नेपाळमध्ये मोठं 'स्कँडल'! पर्यटकांना आजारी पाडून माऊंट एव्हरेस्टवरून रेस्क्यू!

माऊंट एव्हरेस्ट हे आजही जगभरातील गिर्यारोहकांचं आणि अनेक सर्वसामान्य माणसांचंही जिवाभावाचं स्वप्न आहे. त्यामुळे निसर्गाच्या रौद्र रूपाचा सामना करावा लागला, कितीही संकटं आली, तरी आयुष्यात एकदा तरी माऊंट एव्हरेस्ट सर करायचंच अशी अनेकांची इच्छा असते. याच इच्छेपोटी आणि स्वप्नापोटी जगभरातील अनेकांची पावलं हिमालयातील या सर्वोच्च शिखराकडे पडत असतात... पण लोकांच्या याच विश्वासाला धक्कादायक तडा बसला आहे.

नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टशी संबंधित एक मोठं स्कँडल समोर आलं आहे. काठमांडू पोस्टच्या अहवालानुसार काही शेर्पा आणि ट्रेकिंगशी संबंधित लोक मिळून खाण्यात बेकिंग सोडा किंवा एक खास औषध मिसळून पर्यटकांना आजारी पाडत आणि त्यानंतर महागड्या हेलिकॉप्टर रेस्क्यूद्वारे त्यांची ‘सुटका’ करत असत. या पद्धतीनं कोट्यवधींचा विमा घोटाळाही ते करत होते.

नेपाळ पोलिसांनी या प्रकरणी ३२ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. यात ट्रेकिंग कंपनीचे मालक, हेलिकॉप्टर ऑपरेटर आणि रुग्णालयाशी संबंधित लोकांचा समावेश आहे. नेपाळच्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टर रेस्क्यू खूप महाग असतं. यासाठी अडीच ते ६ लाख रुपये खर्च येतो.

नेपाळच्या उंच डोंगराळ भागात हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करणं अनेकदा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असतं. तिथे ऑक्सिजन कमी असतो आणि बऱ्याचदा हवामान अचानक खराब होतं. त्यामुळे आजारी किंवा अडकलेल्या गिर्याराेहकांना लवकरात लवकर मदत, उपचार मिळणं आणि त्यांना काठमांडूत पोहोचवणं गरजेचं असतं.

चौकशीत समोर आलं की काही शेर्पा ट्रेकिंग एजन्सींशी संगनमत करून पर्यटकांच्या खाण्यात बेकिंग सोडा मिसळत होते. त्यामुळे पर्यटकांना तीव्र पोटदुखी, उलट्या आणि इतर त्रास व्हायचा. हा त्रास म्हणजे अनेकांना हाय अल्टिट्यूड सिकनेस वाटायचा. कारण अति उंचीवर गेल्यास अशा प्रकाराचा त्रास होणं सर्वसामान्य मानलं जातं. काही प्रकरणांत डायमॉक्स (उंचीच्या आजारासाठी दिलं जाणारं औषध) देऊन जास्त पाणी पाजलं जात होतं, ज्यामुळे गंभीर लक्षणं निर्माण होत होती. नेपाळ चार्टर सर्व्हिस, एव्हरेस्ट एक्स्पिरियन्स अँड असिस्टन्स आणि माउंटन रेस्क्यू या कंपन्या या घोटाळ्यात मुख्यतः सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. 

अहवालानुसार रेस्क्यूदरम्यान एका हेलिकॉप्टरमध्ये अनेक लोकांना बसवलं जातं, पण प्रत्येकाच्या नावानं वेगळं पूर्ण बिल विमा कंपनीला पाठवलं जातं, जणू प्रत्येकासाठी वेगळी उड्डाणं झाली असतील. उदाहरणार्थ ४००० डॉलरच्या उड्डाणासाठी १२००० डॉलरचा क्लेम केला जायचा. काही प्रकरणांत बनावट नोंदी करून पर्यटकांना रुग्णालयात दाखल असल्याचं दाखवलं गेलं, पण प्रत्यक्षात ते त्याच वेळी रुग्णालयाच्या कँटीनमध्ये बसून ‘खान-पान’ करीत होते! परदेशात बसलेल्या विमा कंपन्यांसाठी दुर्गम डोंगराळ भागात प्रत्यक्षात काय घडलं हे तपासणं खूप कठीण असतं.

या संपूर्ण प्रकारात शेर्पा, हेलिकॉप्टर कंपन्या, ट्रेकिंग एजन्सी आणि रुग्णालय एकत्र येऊन पैसा वाटून घेत होते. या स्कँडलमधून सुमारे १९.६९ मिलियन डॉलर्स (सुमारे १८८ कोटी रुपये) इतकी फसवणूक करण्यात आली.

Web Title : नेपाल में एवरेस्ट घोटाला: पर्यटकों को नशीली दवा, बीमा धोखाधड़ी के लिए रेस्क्यू!

Web Summary : नेपाल में एवरेस्ट पर एक बड़ा घोटाला सामने आया है, जिसमें पर्यटकों को नशीली दवा देकर, हेलीकॉप्टर से रेस्क्यू का नाटक करके बीमा कंपनियों से धोखाधड़ी की गई। ट्रेकर्स को बीमार करने के लिए बेकिंग सोडा या दवाएँ दी गईं। इस घोटाले में ट्रेकिंग कंपनियां, हेलिकॉप्टर ऑपरेटर और अस्पताल शामिल थे, जिससे करोड़ों की धोखाधड़ी हुई।

Web Title : Nepal Everest Scam: Tourists Drugged, Rescued for Insurance Fraud!

Web Summary : A major scam in Nepal involved drugging tourists on Everest, staging costly helicopter rescues, and filing fraudulent insurance claims. Trekkers were given baking soda or drugs to induce illness. The scheme involved trekking companies, helicopter operators, and hospitals, defrauding millions.