‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 05:42 IST2025-07-27T05:42:50+5:302025-07-27T05:42:50+5:30
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला १० हून अधिक राज्यांचा विरोध

‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
वॉशिंग्टन : अमेरिकेत अवैधरीत्या राहणाऱ्या माता-पित्यांच्या मुलांना दिले जाणारे जन्माधारित नागरिकत्व रद्द करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला आणखी एका केंद्रीय न्यायालयाने शनिवारी स्थगिती दिली. जूनमध्ये यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अशी स्थगिती देणारे हे तिसरे न्यायालय आहे. ट्रम्प यांच्या नागरिकत्वासंबंधी या आदेशाला अमेरिकेतील दहाहून अधिक राज्यांनी विरोध दर्शवला आहे. जन्माधारित नागरिकत्व नाकारणे हे घटनेविरोधात असल्याचे या राज्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या निकालानंतर आता हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी जाईल.
न्यू जर्सीचे ॲटर्नी जनरल मॅथ्यू प्लॅटकिन यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला. अमेरिकेत जन्मलेले प्रत्येक मूल हे अमेरिकी नागरिक आहे. राष्ट्राध्यक्ष एका स्वाक्षरीच्या आधारे हा कायदेशीर नियम बदलू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीयांना दिलासा
अमेरिकेत अप्रवासी भारतीयांची संख्या प्रचंड आहे. या भारतीयांच्या मुलांच्या नागरिकत्वावर ट्रम्प यांच्या निर्णयामुळे प्रश्नचिन्ह होते. या वर्षानुवर्षे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अप्रवासी नागरिकांना अवैध नागरिक म्हणून मानले गेले होते. न्यायालयाच्या निकालामुळे या सर्वांना दिलासा मिळाला आहे.