पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:21 IST2025-08-09T10:21:28+5:302025-08-09T10:21:42+5:30
एकीकडे दहशतवादी पाकिस्तानला गेल्या अनेक दशकांपासून अमेरिका जवळ करत असताना जगात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानात मोठ्या राजकीय ...

पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
एकीकडे दहशतवादी पाकिस्तानला गेल्या अनेक दशकांपासून अमेरिका जवळ करत असताना जगात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानात मोठ्या राजकीय उलथापालथी होत आहेत. इम्रान खान यांच्या पक्षाचे पीटीआय नेते ओमर अयुब यांना विरोधी पक्षनेतेपदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यांना दिलेले कार्यालयही परत घेण्यात आले आहे.
राष्ट्रीय असेंब्ली सचिवालयाने अधिकृतपणे याची पुष्टी केली आहे. लवकरच नवीन विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीसाठी अधिसूचना जारी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. उमर अयुब यांच्यासह पीटीआयचे आणखी दोन मोठे नेते, जरताज गुल आणि अहमद चट्टा यांनाही त्यांच्या संसदीय पदांवरून काढून टाकण्यात आले आहे.
जरताज गुल यांना संसदीय नेतेपदावरून आणि अहमद चट्टा यांना उपसंसदीय नेतेपदावरून काढून टाकण्यात आले. याचबरोबर अयुब यांना सार्वजनिक लेखा समिती आणि वित्त समितीतूनही बाहेरचा मार्ग दाखविण्यात आला आहे.
काही पीटीआय खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सात खासदारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. दहशतवादविरोधी न्यायालयाने उमर अयुब, शिबली फराज यांच्यासह अनेक पीटीआय नेत्यांना दोषी ठरविले होते. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पेशावर उच्च न्यायालयाने (PHC) उमर अयुब आणि शिबली फराज यांना दिलासा दिलेला असला तरीही ही कारवाई करण्यात आली आहे. अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. दोन्ही नेत्यांना त्यांच्या अनुपस्थितीत दोषी ठरवण्यात आले होते, परंतु आता ते न्यायालयात हजर झाले आहेत आणि त्यांना संरक्षणात्मक जामीन मिळाला आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.