महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 08:41 IST2025-12-25T08:40:12+5:302025-12-25T08:41:19+5:30
अमेरिकेच्या न्याय विभागाने बुधवारी एक मोठी घोषणा केली असून, एपस्टीन प्रकरणाशी संबंधित तब्बल १० लाख नवी कागदपत्रे त्यांच्या हाती लागली आहेत.

महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
जगाला हादरवून सोडणाऱ्या जेफरी एपस्टीन लैंगिक शोषण प्रकरणाने आता पुन्हा एकदा अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने बुधवारी एक मोठी घोषणा केली असून, एपस्टीन प्रकरणाशी संबंधित तब्बल १० लाख नवी कागदपत्रे त्यांच्या हाती लागली आहेत. ही कागदपत्रे येत्या काही आठवड्यांत टप्प्याटप्प्याने सार्वजनिक केली जाणार आहेत. या नव्या खुलाशामुळे जगभरातील अनेक बड्या राजकारण्यांचे आणि सेलिब्रिटींचे धाबे दणाणले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात 'फेक' दाव्यांचा पाऊस!
नुकत्याच जारी करण्यात आलेल्या ३०,००० पानांच्या कागदपत्रांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल काही खळबळजनक आणि सनसनाटी दावे करण्यात आले होते. मात्र, न्याय विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, हे सर्व दावे पूर्णपणे निराधार आणि खोटे आहेत. २०२० च्या निवडणुकीच्या अगदी आधी हे कागदपत्र एफबीआयला सोपवण्यात आले होते. जर या दाव्यांमध्ये थोडी जरी तथ्ये असती, तर त्यांचा वापर ट्रम्प यांच्याविरोधात केव्हाच केला गेला असता, असेही विभागाने नमूद केले आहे. ट्रम्प यांच्या 'मार-ए-लागो' क्लबला २०२१ मध्ये पाठवलेले समन्स देखील या फाइलमध्ये समाविष्ट आहे.
काय आहे 'त्या' पत्राचे गूढ?
या फाईल्समध्ये एपस्टीनच्या स्वाक्षरीचे एक पत्रही समोर आले आहे, जे त्याने तुरुंगात असताना लैंगिक गुन्हेगार लॅरी नासरला पाठवल्याचे भासवले होते. या पत्रात 'आमचे राष्ट्राध्यक्ष' असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, एफबीआयच्या तपासात हा मोठा बनाव असल्याचे सिद्ध झाले आहे. पत्रावरील हस्ताक्षर एपस्टीनचे नसून, आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावर एपस्टीनच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी शिक्का मारण्यात आला आहे. त्यामुळे हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१० लाख कागदपत्रांची होणार छाननी
एफबीआय आणि न्यूयॉर्कच्या अटर्नी कार्यालयाने न्याय विभागाला ही नवी १० लाख कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट आणि न्यायालयीन आदेशांनुसार ही कागदपत्रे तपासावी लागणार आहेत. पीडितांची सुरक्षा आणि गोपनीयतेचा विचार करून ही कागदपत्रे प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यांची बारकाईने पडताळणी केली जात आहे. यासाठी तज्ज्ञांचे पथक २४ तास काम करत आहे.
काय आहे एपस्टीन प्रकरण?
जेफरी एपस्टीन हा एक हाय-प्रोफाईल गुन्हेगार होता, ज्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या तस्करीचे आणि शोषणाचे गंभीर आरोप होते. २०१९ मध्ये तुरुंगात असतानाच त्याने आत्महत्या केली होती. मात्र, त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रभावशाली व्यक्तींची नावे वारंवार समोर येत असल्याने हे प्रकरण नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे. आता या नव्या १० लाख पानांच्या खजिन्यातून आणखी किती बड्या लोकांची नावे बाहेर येतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.