ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 09:13 IST2025-11-04T08:54:33+5:302025-11-04T09:13:29+5:30

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात रशियाहून भारतात येणाऱ्या कच्च्या तेलात घट झाली आहे.

Big Dip in Russian Oil company Supply to India After US Bans | ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?

ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?

Russian Oil Import: गेल्या साडेतीन वर्षांपासून भारतरशियाचा सर्वात मोठा कच्चा तेल ग्राहक बनला असताना आता या आयातीत मोठी घट नोंदवली गेली आहे. अमेरिकेने रशियाच्या प्रमुख तेल कंपन्यांवर नुकत्याच लादलेल्या कठोर निर्बंधांमुळे जागतिक ऊर्जा व्यापारावर थेट परिणाम दिसून आला असून, भारताच्या आयातीवर त्याचा स्पष्ट प्रभाव पडला आहे. २२ ऑक्टोबर रोजी अमेरिकेने रशियन तेल कंपन्यां रोझनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध जाहीर केल्यानंतर भारताला होणाऱ्या रशियन तेल पुरवठ्यात मोठी घट होत आहे.

केप्लर या शिप ट्रॅकिंग संस्थेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात रशियाकडून भारताला होणारा क्रूड ऑइलचा दैनंदिन पुरवठा १.९५ दशलक्ष बॅरलवरून १.१९ दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतका झाला आहे. ही घसरण अमेरिकेने रशियाच्या रोसनेफ्ट आणि लुकोइल या दोन मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध जाहीर केल्यानंतर लगेचच सुरू झाली. गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला पंतप्रधान मोदींनी भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवल्याचे सांगितले आहे असा दावा केला होता. मात्र भारताने आपल्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली होती.

त्यानंतर आता अमेरिकेने कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या कंपन्यांवर निर्बंध लादले. या दोन कंपन्या रशियाच्या एकूण तेल निर्यात आणि उत्पादनात अर्ध्याहून अधिक वाटा उचलतात. तसेच भारताला मिळणाऱ्या रशियन तेलापैकी मोठा भाग याच कंपन्या पुरवत होत्या. ताज्या आकडेवारीनुसार, रशियाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या रोसनेफ्ट कडून होणारा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे, तर दुसरी प्रमुख कंपनी लुकोइल कडून तर गेल्या काही आठवड्यांपासून कोणतीही तेल आयात झाली नाही.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने आपण अमेरिकेने लादलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही तज्ज्ञांच्या मते, भारताची रशियन तेल आयात लगेचच पूर्णपणे थांबणार नाही. 'केप्लर'चे लीड रिसर्च ॲनालिस्ट सुमित रिटोलिया सांगतात की जोपर्यंत भारतीय रिफायनरींवर थेट टॅरिफ लावले जात नाही, तोपर्यंत रशियाकडून पुरवठा सुरू राहील. याचे कारण म्हणजे रशियामध्ये या दोन कंपन्यांव्यतिरिक्त अनेक लहान कंपन्या कार्यरत आहेत, ज्यांच्यामार्फत भारताला कच्चा तेल मिळत राहील. सध्या भारत आपल्या एकूण तेलाच्या गरजेपैकी ३५ टक्के तेल एकट्या रशियाकडून आयात करतो.

अमेरिकेने निर्बंधांसाठी २१ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली असल्याने, पुढील काही आठवड्यांत भारतीय बंदरांवर तेलाची डिलिव्हरी सामान्य राहण्याची शक्यता आहे, कारण हे तेल निर्बंधांपूर्वीच जहाजातून रवाना झाले होते. मात्र, पुढे भारताला आपल्या ऊर्जा स्रोतांसाठी पर्यायी पुरवठादारांचा विचार करावा लागू शकतो.
 

Web Title: Big Dip in Russian Oil company Supply to India After US Bans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.