पाचऐवजी साडेचार दिवस करावे लागणार काम, UAE सरकारने कामाचा आठवडा केला कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 06:29 PM2021-12-07T18:29:28+5:302021-12-07T18:32:16+5:30

साडेचार दिवसांचा आठवडा करणारा UAE जगातील पहिलाच देश आहे.

A big decision of the UAE government, four and half days a week in government offices | पाचऐवजी साडेचार दिवस करावे लागणार काम, UAE सरकारने कामाचा आठवडा केला कमी

पाचऐवजी साडेचार दिवस करावे लागणार काम, UAE सरकारने कामाचा आठवडा केला कमी

Next

दुबई: संयुक्त अरब अमिरात(UAE)ने आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मोठी भेट देणार आहे. UAE मध्ये 1 जानेवारी 2022 पासून आठवड्यात फक्त साडेचार दिवस काम होणार आहे. उर्वरित अडीच दिवस कर्मचाऱ्यांना सुटी मिळणार आहे. यूएई सरकारने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. 

येत्या काही दिवसांत हे सरकारी परिपत्रक सर्व सरकारी कार्यालयांना पाठवले जाणार आहे. साप्ताहिक कामकाजाचे तास कमी करणारा UAE हा जगातील पहिला देश आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये पाच दिवसांच्या कामकाजाचा आठवडा संस्कृती आहे. 1971 ते 1999 पर्यंत देशात आठवड्यातून 6 दिवस काम होते. 1999 मध्ये ते पाच दिवस आणि आता साडेचार दिवस करण्यात आले आहे.

खासगी क्षेत्रालाही नियम लागू होण्याची शक्यता

UAE तील वृत्तपत्र 'द नॅशनल'मधील बातमीनुसार, 1 जानेवारी 2022 पासून नवीन वर्किंग कॅलेंडर लागू करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हा नवीन नियम सध्या फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. पण, येणाऱ्या काळात याच नियमांच्या आधारे देशातील खाजगी क्षेत्र देखील अशीच पावले उचलेल असा विश्वास आहे.

शुक्रवारी फक्त अर्धा दिवस काम

या नवीन नियमाननंतर शुक्रवारी फक्त अर्धा दिवस काम असेल. तसेच, शनिवार आणि रविवारी पूर्ण सुट्टी असेल. आदेशानुसार, जर कर्मचाऱ्यांना शुक्रवारी घरून काम करायचे असेल, तर त्यांना त्याची मंजुरी घ्यावी लागेल. सरकारच्या या घोषणेने दुबई आणि अबुधाबीमधील कर्मचारी खूप खूश आहेत. 

शाळा-कॉलेजसाठीही नियम

रिपोर्टनुसार लवकरच देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये देखील या नवीन नियमाचे पालन करतील. या संदर्भात स्वतंत्र परिपत्रक जारी केले जाऊ शकते. मात्र, शाळा आणि खासगी क्षेत्राबाबत अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाहीत. कंपन्या स्वत: निर्णय घेतील.

उत्पादकता वाढवण्यावर भर
UAE सरकारच्या अधिकृत मीडिया सेलने सांगितले की, जर आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना कामाच्या बदल्यात समान विश्रांती दिली तर त्यांची उत्पादकता वाढू शकेल. याचा फायदा देशालाच होणार आहे. UAE ने शेवटचा 2006 मध्ये कामकाजाच्या आठवड्याचा पॅटर्न बदलला होता. त्यानंतर गुरुवार-शुक्रवारऐवजी शुक्रवार-शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.


 

Web Title: A big decision of the UAE government, four and half days a week in government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.