Miss Universe: मिस युनिव्हर्स स्पर्धेचा महत्वाचा नियम बदलण्याची शक्यता; विवाहित, मातांना देखील भाग घेता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 15:30 IST2022-08-22T15:29:55+5:302022-08-22T15:30:35+5:30
Miss Universe unmarried rule change: मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जगभरातील महिलांसाठी भरविण्य़ात येते. 2023 मध्ये 72 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी नवीन स्वरूप लागू केले जाईल.

Miss Universe: मिस युनिव्हर्स स्पर्धेचा महत्वाचा नियम बदलण्याची शक्यता; विवाहित, मातांना देखील भाग घेता येणार
मिस युनिव्हर्स स्पर्धेचा महत्वाचा नियम बदलण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत आतापर्यंत केवळ लग्न न झालेल्याच तरुणी भाग घेऊ शकत होत्या, परंतू आता लग्न झालेल्या महिला, माता देखील भाग घेऊ शकणार आहेत. या नव्या नियमांची सुरुवात २०२३ मध्ये होऊ शकते.
मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जगभरातील महिलांसाठी भरविण्य़ात येते. इंडियन एक्सप्रेसने याबाबचे वृत्त दिले आहे. 2023 मध्ये 72 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी नवीन स्वरूप लागू केले जाईल. आता विवाहित महिला आणि माताही स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र असतील. सध्याच्या नियमांनुसार मिस युनिव्हर्समध्ये सहभागी होणाऱ्या महिला अविवाहित असणे आवश्यक आहे. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या तरुणीला पुढच्या स्पर्धेत नवीन विजेता घोषित होत नाही तोवर लग्न करता येत नाही. एवढेच नाही तर मिस युनिव्हर्स स्पर्धेतील विजेत्याल्या या काळात गरोदर देखील राहता येत नाही. आता या अटींमध्ये किती बदल होतो, ते अद्याप समजलेले नाही.
परंतू, विवाहित महिला आणि मातांना त्यात सहभागी होण्याची परवानगी देऊन मिस युनिव्हर्स स्पर्धेचा आवाका वाढविला जाणार आहे. असे असले तरी वयाची अट तीच ठेवली जाणार आहे. 18 ते 28 वयोगटातील ज्या महिलांचे लग्न झाले नव्हते आणि त्यांना मुलेही नव्हती त्यांनाच यात सहभागी होता येत होते. आता लग्न झालेल्या किंवा माता असलेल्या महिलांना देखील १८ ते २८ हीच वयाची अट असणार आहे.
मिस युनिव्हर्स 2020 चा ताज जिंकलेली मेक्सिकन मॉडेल अँड्रिया मेझा हिने या पावलाचे कौतुक केले आहे. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांचे लहान वयात लग्न झालेय किंवा त्यांना 20 व्या वर्षी मुले झाली होती. यामुळे त्यांना मिस युनिव्हर्समध्ये भाग घ्यावा वाटत असूनही नियमांमुळे तसे करता आले नाही. आता या बदलांमुळे त्या महिला त्यांचे करिअर सुरू करू शकतील, असे ती म्हणाली.