ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 11:05 IST2025-08-17T11:03:05+5:302025-08-17T11:05:53+5:30
America Donald Trump Tariff News: अमेरिकेने लादलेले ५० टक्के ट्रम्प टॅरिफ लवकरच लागू होणार असून, ही बैठक लांबणे भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
America Donald Trump Tariff News: ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के शुल्क आकारले असून, त्यात रशियन तेल खरेदीसाठी २५ टक्के शुल्काचा समावेश आहे. हे शुल्क २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. त्याबाबत भारताने म्हटले होते की, भारताला लक्ष्य करणे अन्यायकारक आहे. टॅरिफवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे व्यापारविषयक एक पथक भारत दौऱ्यावर येणार होते. नवी दिल्लीत यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक होणार होती. परंतु, व्यापारविषयक पथकाने दौरा रद्द केल्याने ट्रम्प टॅरिफवरील चर्चा रखडू शकते, असे म्हटले जात आहे.
रशियाने भारतासारखा मोठा तेलग्राहक गमावला आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत होता. चीनही रशियाकडून बऱ्याच गोष्टी घेत आहे. रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवणाऱ्या देशांवर विशेषतः भारतावर अमेरिका दुय्यम आयात शुल्क लावणार नाही, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. हे अतिरिक्त शुल्क लागू केले असते तर त्याचा भारतावर मोठा परिणाम झाला असता. पण असे पाऊल उचलण्याची वेळ आली तर मी अजिबात मागे हटणार नाही, असा इशारा देत कदाचित असा निर्णय घेण्याची वेळ येणार नाही असे वाटते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
बैठक लांबणे भारताला मोठा धक्का मानला जातोय
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कापासून भारताला कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावरील सहाव्या फेरीच्या चर्चेला स्थगिती दिल्याने भारताला मोठा धक्का बसला. ही बैठक २५ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान दिल्लीत होणार होती. एका अमेरिकन अधिकाऱ्याने माहिती दिली की, ही भेट कदाचित पुन्हा नियोजित केली जाईल. आतापर्यंत भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये व्यापाराबाबत पाच फेऱ्या झाल्या आहेत. सहाव्या फेरीतील चर्चा होणार होती. परंतु, आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. अमेरिकेने भारतावर लादलेला अतिरिक्त २५ टक्के म्हणजेच एकूण ५० टक्के कर २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. त्यामुळे बैठक पुढे ढकलणे हे भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध मीच थांबविले असा दावा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. विमानात त्यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी आतापर्यंत सहा युद्धे थांबविली आहेत. भारत-पाकिस्तानमधील संभाव्य युद्धाच्या मुद्द्याचा त्यात समावेश आहे. काँगो-रवांडा, थायलंड-कंबोडिया, आर्मेनिया-अझरबैजान यांच्यातील संघर्षांचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, भारत व पाकिस्तान संघर्षात त्यांनी एकमेकांची विमाने पाडली. त्यांनी अणुयुद्धही केले असते. परंतु, अमेरिकेने या गोष्टी वेळीच रोखल्या.