डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:07 IST2025-09-09T10:52:49+5:302025-09-09T11:07:23+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. लैंगिक शोषण प्रकरणात ट्रम्प यांना ८३ मिलियन डॉलर्स भरपाईचा निर्णय कायम ठेवला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने झटका दिला आहे. पत्रकार आणि लेखक ई. जीन कॅरोल यांना देण्यात आलेले ८३ मिलियन डॉलर्स म्हणजेच ६९३ कोटी रुपये नुकसानभरपाई रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
८१ वर्षीय ई. जीन कॅरोल या Elle मासिकाच्या माजी स्तंभलेखिका आहेत. १९९० च्या दशकात न्यूयॉर्कमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये ट्रम्प यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. २०१९ मध्ये ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले. यावेळी त्यांनी एका पत्रकाराला सांगितले की कॅरोल माझ्या प्रकारची नाही आणि तिने तिचे पुस्तक विकण्यासाठी ही स्टोरी रचली होती.
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
न्यायालयाचा निर्णय
"या प्रकरणातील असाधारण आणि गंभीर परिस्थिती लक्षात घेता ज्युरीने दिलेला नुकसानभरपाईचा निर्णय योग्य आहे.", असे तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे. ट्रम्प या प्रकरणात राष्ट्रपतींच्या शक्तीचा दावा करू शकत नाहीत.
ट्रम्प यांनी असा युक्तिवाद केला की, २०२४ च्या अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना व्यापक अधिकार मिळतात, जे दिवाणी खटल्यांना देखील लागू झाले पाहिजेत. २०१९ मधील त्यांची विधाने राष्ट्रपतींच्या अधिकृत कर्तव्यांचा भाग होती आणि जर प्रतिकारशक्ती दिली गेली नाही तर कार्यकारी शाखा कमकुवत होईल, असंही त्यांनी म्हटले आहे. परंतु न्यायालयाने हे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले.
आतापर्यंतची कार्यवाही
मे २०२३ मध्ये, दुसऱ्या ज्युरीने ट्रम्प यांना ५ मिलियन डॉलर्स (अंदाजे ४२ कोटी रुपये) नुकसान भरपाई दिली. जून २०२४ मध्ये, दुसऱ्या सर्किट कोर्टानेही तो निर्णय कायम ठेवला.
जानेवारी २०२४ मध्ये आलेल्या ८३.३ मिलियन डॉलर्सच्या निकालात कॅरोलच्या भावनिक आणि प्रतिष्ठेच्या नुकसानीसाठी १८.३ मिलियन डॉलर्स आणि दंडात्मक नुकसानभरपाई म्हणून ६५ मिलियन डॉलर्सचा समावेश होता.
व्हाईट हाऊस आणि ट्रम्प यांच्या वकिलांनी अद्याप या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या वर्षी जूनमध्ये कॅरोल यांनी त्यांचे नवीन पुस्तक "नॉट माय टाइप: वन वुमन व्हर्सेस अ प्रेसिडेंट" प्रकाशित केले, यामध्ये त्यांनी ट्रम्प यांच्याविरुद्धच्या त्यांच्या कायदेशीर लढाईंचे तपशीलवार वर्णन केले आहे. सध्या, हा निर्णय ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.