अमेरिकेत बायडेन-कमला पर्व; जो बायडेन अध्यक्षपदी, कमला हॅरिस पहिल्या महिला उपाध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 06:59 IST2021-01-21T00:49:34+5:302021-01-21T06:59:46+5:30
दुपारी १२च्या ठोक्याला अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना पदाची शपथ दिली. या वेळी बायडेन यांनी १२७ वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या कौटुंबिक बायबलची प्रत हातात घेतली होती.

अमेरिकेत बायडेन-कमला पर्व; जो बायडेन अध्यक्षपदी, कमला हॅरिस पहिल्या महिला उपाध्यक्ष
वॉशिंग्टन : कोरोनामुळे मरगळलेली अर्थव्यवस्था... कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे वाढत चाललेली मृतांची संख्या... कॅपिटॉल हिलवर अलीकडेच झालेला हल्ला... अशी चारही बाजूंनी निराशाजनक परिस्थिती असताना व्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या वेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या सोहळ्याला पाठ दाखवली. मात्र, मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.
दुपारी १२च्या ठोक्याला अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना पदाची शपथ दिली. या वेळी बायडेन यांनी १२७ वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या कौटुंबिक बायबलची प्रत हातात घेतली होती. २५ हजार सुरक्षारक्षकांच्या गराड्यात शपथविधी सोहळा झाला. कॅपिटॉल हिलवर अलीकडे झालेल्या हल्ल्याची काळी किनार सोहळ्याला होती.
७८ वर्षीय बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत वयोवृद्ध अध्यक्ष ठरले आहेत. तर कमला हॅरिस या प्रथम महिला उपाध्यक्ष ठरल्या आहेत. शपथविधी सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी बायडेन यांनी वॉशिंग्टनमधील सेंट मॅथ्यूज कॅथेड्रल चर्चमधील सामूहिक प्रार्थनेला उपस्थिती लावली. या वेळी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. त्यानंतर सर्व जण व्हाइट हाउसच्या प्रांगणात शपथविधी सोहळ्यासाठी रवाना झाले.
बायडेन यांनी ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ -
कॅपिटॉल हिल परिसर बायडेन यांच्या घाेषाने दणाणला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश, बिल क्लिंटन, बराक ओबामांची उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी द्विटरद्वारे दिल्या बायडेन यांना शुभेच्छा.
ट्रम्प म्हणाले, ‘मी पुन्हा येईन!’ -
व्हाइट हाउसमधून अखेरच्या दिवशी बाहेर पडताना डोनाल्ड ट्रम्प भावुक झाले. ते म्हणाले, राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाची सेवा करणे हा सर्वोत्तम गौरव आहे. व्हाइट हाउसकडे पाहात ट्रम्प म्हणाले, सध्या या वास्तूला गुडबाय करतोय. पण, हा कायमचा नसेल. मी पुन्हा येईन. पुन्हा भेट होईल.