३५ वर्षीय भारतीय युवकाची माहिती देणाऱ्यास अमेरिकन पोलीस देणार २ कोटी; भानगड काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:17 IST2025-01-17T14:16:46+5:302025-01-17T14:17:25+5:30
तपास यंत्रणेनुसार पलकला भारतात परतायचं होते परंतु भद्रेशला ते नको होते. यावरून बऱ्याचदा दोघांमध्ये वाद व्हायचे. व्हिसा संपून एक महिन्याहून अधिक काळ लोटला होता.

३५ वर्षीय भारतीय युवकाची माहिती देणाऱ्यास अमेरिकन पोलीस देणार २ कोटी; भानगड काय?
नवी दिल्ली - नाव भद्रेश कुमार सी पटेल, जन्मतारीख - १५ मे १९९०, उंची ५ फूट ९ इंच, राष्ट्रीयता - भारतीय, जन्म ठिकाण - वारागाम गुजरात, बक्षीस २५०००० डॉलर म्हणजे जवळपास २.१ कोटी रुपये. ही माहिती आहे अमेरिकेतली टॉप १० मॉस्ट वॉन्टेड फरार आरोपी यादीतील भारतीय युवकाची..८ वर्षापूर्वी एप्रिल २०१७ पटेल FBI च्या टॉप १० मॉस्ट वॉन्टेड फरार आरोपींमध्ये सहभागी होता. त्यावेळी त्याच्यावर १ लाख डॉलर म्हणजे ८५ लाखाचे बक्षीस होते. मात्र अद्याप तो एफबीआयच्या हाती आला नाही. अखेर कोण आहे भद्रेश कुमार चेतन भाई पटेल आणि त्याने असं काय केले ज्यामुळे त्याचा शोध FBI पोलीस घेत आहेत हे जाणून घेऊया.
भद्रेश कुमार याच्यावर पत्नी पलक पटेलची हत्या केल्याचा आरोप आहे. हे दोघे एकत्र काम करत होते आणि १२ एप्रिल २०१५ साली भद्रेशने त्याच्या पत्नीची हत्या केली होती. भद्रेश कुमार आणि पलक पटेलचं लग्न नोव्हेंबर २०१३ साली झालं होते. लग्नानंतर १ वर्षांनी सप्टेंबर २०१४ साली हे दोघे अमेरिकेतील त्यांच्या नातेवाईकांकडे गेले. तेव्हा भद्रेशचं वय २४ आणि पलकचं वय २१ वर्ष होते. अमेरिकेत दोघांनी डोनट शॉपमध्ये काम करण्यास सुरूवात केली. हे दुकान पटेल यांच्या नातेवाईकांचे होते. दोघांचा व्हिसा संपला होता. तपास यंत्रणेनुसार पलकला भारतात परतायचं होते परंतु भद्रेशला ते नको होते. यावरून बऱ्याचदा दोघांमध्ये वाद व्हायचे. व्हिसा संपून एक महिन्याहून अधिक काळ लोटला होता.
१२ एप्रिल २०१५ साली रात्री दोघेही डोनेट शॉपमध्ये नाईट शिफ्ट करत होते. त्याचवेळी भद्रेश आणि पलकमध्ये वाद झाला आणि या वादातून भद्रेशने पत्नीवर हल्ला केला. पीटीआयच्या २०१७ च्या रिपोर्टनुसार भद्रेशने किचनमधील चाकूने पलकवर वार केले आणि त्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून भद्रेश पटेल फरार आहे. तपासावेळी एफबीआयने हत्येच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोघे दुकानात काम करत असतात. ते एकत्र किचनमध्ये जाताना दिसतात आणि पुन्हा भद्रेश एकटाच बाहेर येताना दिसतो. त्याच रात्री पलकचा मृतदेह सापडतो. पत्नीची हत्या करून भद्रेश पळून जातो. दुकानातून तो चालत त्याच्या घरी पोहचतो तिथून काही सामान घेऊन नेवार्कच्या लिबर्टी एअरपोर्टजवळील हॉटेलला पोहचतो. पलकच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी तो न्यू जर्सीच्या नेवार्क पेन स्टेशनवर दिसतो त्यानंतर त्याचा काही सुगावा लागला नाही.
दरम्यान, अमेरिकेतील पोलीस अधिकाऱ्यांना संशय आहे की भद्रेश अमेरिका सोडून पळाला आहे किंवा त्याच्या दूरच्या नातेवाईकाकडे राहत आहे. त्याचा व्हिसा संपलेला आहे त्यामुळे कायदेशीरपणे त्याला अमेरिकेतून जाणे कठीण आहे. काहींच्या मते तो अमेरिकेतून बेकायदेशीरपणे कॅनडा आणि कॅनडातून भारतात गेल्याचा संशय आहे. परंतु एफबीआयच्या टॉप १० मॉस्ट वॉन्टेड आरोपींमध्ये भद्रेशचा समावेश आहे. ज्याची माहिती देणाऱ्यास अमेरिकन पोलीस २.१ कोटी रुपये बक्षीस देणार आहे.