भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:28 IST2025-10-30T10:28:01+5:302025-10-30T10:28:37+5:30
Nuclear weapons test war, Donald Trump: रशियाच्या न्यूक्लियर ड्रोन चाचणीनंतर ट्रम्प आक्रमक. पेंटागॉनला अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याचे निर्देश. '५ वर्षांत चीन बरोबरी करेल' - ट्रम्प यांचा इशारा. वाचा धोरणात्मक बदलाचे कारण.

भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
रशियाने नुकत्याच केलेल्या अण्वस्त्र-शक्तीवर चालणाऱ्या पाण्याच्या आतील ड्रोनच्या यशस्वी चाचणीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जगातील वाढत्या आण्विक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांनी पेंटागॉनला अमेरिकेच्या अण्वस्त्रांची चाचणी तातडीने पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे जगाला बऱ्याच काळानंतर ट्रम्प यांनी अण्वस्त्रांच्या स्पर्धेत खेचण्यास सुरुवात केली आहे.
दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असताना हेलिकॉप्टरमधून ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धक्कादायक घोषणा करून टाकली. "इतर देशांच्या चाचणी कार्यक्रमांमुळे, मी 'डिपार्टमेंट ऑफ वॉर' ला निर्देश दिले आहेत की त्यांनी आपल्या अण्वस्त्रांची चाचणी समान आधारावर सुरू करावी. ही प्रक्रिया तात्काळ सुरू होईल.", असे त्यांनी रशियाचे नाव न घेता पोस्ट केली आणि खळबळ उडाली आहे.
अमेरिकेकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत, असे म्हणत ट्रम्प यांनी जागतिक आण्विक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले, "रशिया दुसऱ्या स्थानावर आहे, तर चीन तिसऱ्या स्थानावर आहे, पण चीन पुढील ५ वर्षांत अमेरिकेच्या बरोबरीने येईल. यामुळे अमेरिकेचे सामरिक श्रेष्ठत्व कायम राखण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक आहे", असे ते म्हणाले.
'मला हे आवडले नाही, पण पर्याय नव्हता!
अण्वस्त्रांच्या प्रचंड विनाशकारी शक्तीमुळे हा निर्णय घेताना त्यांना वैयक्तिकरित्या संकोच वाटला, असे ट्रम्प यांनी नमूद केले. ते म्हणाले, "प्रचंड विनाशकारी शक्तीमुळे, मला हे करायचे नव्हते, पण माझ्याकडे पर्याय उरला नाहीय!"
रशियाने काय केले...
रशियाने नुकताच 'पोसायडॉन' नावाच्या आण्विक-शक्तीवर चालणाऱ्या अंडरवॉटर ड्रोनची चाचणी यशस्वी केल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी घेतलेला हा निर्णय अमेरिकेच्या दशकांपासूनच्या आण्विक चाचणी धोरणातून एक मोठे बदल दर्शवतो आणि आंतरराष्ट्रीय शस्त्र नियंत्रण करारांवर याचे मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे.