भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 08:30 IST2025-11-01T08:30:11+5:302025-11-01T08:30:35+5:30
Bankim Brahmbhatt scam: अमेरिकेत भारतीय वंशाचे उद्योजक बँकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर ४००० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप. ब्रॉडबँड टेलिकॉम कंपनीतून 'ब्लॅकरॉक' आणि 'एचपीएस' ला कसा फटका बसला, वाचा सविस्तर वृत्त.

भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
अमेरिकेत भारतीय वंशाचे दूरसंचार उद्योजक बंकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर सुमारे ५० कोटी डॉलर (₹४,००० कोटींहून अधिक) च्या प्रचंड आर्थिक फसवणुकीचा आरोप लावण्यात आला आहे. आपल्या ब्रॉडबँड टेलिकॉम आणि ब्रिजवॉईस या कंपन्यांसाठी अमेरिकन बँकांकडून मोठे कर्ज मिळवण्यासाठी त्यांनी बनावट ग्राहक खाती आणि खोट्या कमाईचे दस्तऐवज तयार केले, असा दावा करण्यात येत आहे.
वॉल स्ट्रीट जर्नल (WSJ) च्या वृत्तानुसार, ब्रह्मभट्ट यांनी आपल्या व्यवसायाचा ग्राहक आधार आणि महसूल अतिशय मजबूत असल्याचे भासवून अनेक मोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित केले. मात्र, प्रत्यक्षात हे आकडे अस्तित्वात नसलेल्या ग्राहकांवर आणि बोगस व्यवहारांवर आधारित होते. या घोटाळ्यात जागतिक स्तरावरील प्रमुख आर्थिक संस्था, जसे की एचपीएस इन्व्हेस्टमेंट पार्टनर्स आणि ग्लोबल ॲसेट मॅनेजमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी ब्लॅकरॉक यांनी देखील मोठा निधी दिला होता. त्यांनाही मोठा फटका बसला आहे.
२०२४ मध्ये खटला दाखल
ऑगस्ट २०२४ मध्ये कर्जदारांनी ब्रह्मभट्ट यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला. ब्रह्मभट्ट यांनी कंपनीच्या अस्तित्वात नसलेल्या महसूल स्रोतांना कर्जासाठी हमी म्हणून गहाण ठेवले, असा आरोप या खटल्यात करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२० पासून एचपीएसने ब्रह्मभट्ट यांच्या एका कंपनीला कर्ज देण्यास सुरुवात केली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे अमेरिकेतील वित्तीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
पत्रकार जेव्हा ब्रम्हभट यांच्या न्यूयॉर्कच्या गार्डन सिटीतील कार्यालयात गेले तेव्हा ते बंद होते. आजुबाजुच्या लोकांनी ते कित्येक आठवड्यांपासून बंदच असल्याचे सांगितले. तर या प्रकरणाचा तपास करणाऱ्यांशी संबंधीत सुत्रांनी ब्रम्हभट भारतात पळून गेल्याची शक्यता व्यक्त केली आहे.