बांगलादेशचा यू-टर्न! भारतासोबतचा १८० कोटींचा संरक्षण करार रद्द केला; चीनसोबतची जवळीक वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 11:18 IST2025-05-23T11:17:33+5:302025-05-23T11:18:40+5:30
बांगलादेशने गार्डन रीच शिपबिल्डर्ससोबतचा २१ मिलियन डॉलर्सचा संरक्षण करार रद्द केला आहे.

बांगलादेशचा यू-टर्न! भारतासोबतचा १८० कोटींचा संरक्षण करार रद्द केला; चीनसोबतची जवळीक वाढवली
बांगलादेशमधील शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर प्रोफेसर मुहम्मद युनूस यांच्या हाती देशाची सूत्र आलीत. त्यांच्या हाती कारभार आल्यानंतर त्यांनी भारतासोबतचे संबंध तोडण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. आता युनूस यांनी चीन आणि पाकिस्तानची जवळीक वाढवली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी झालेला एक महत्त्वाचा करार बांगलादेश सरकारने रद्द केला आहे.
बांगलादेशसाठी ८०० टन वजनाची आधुनिक समुद्रात जाणारी टग बोट तयार करण्यासाठी कोलकातास्थित गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स सोबत २१ मिलियन डॉलर्सचा हा करार होता.
बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
जुलै २०२४ मध्ये बांगलादेशची राजधानी ढाका येथे बांगलादेश नौदलाच्या संरक्षण खरेदी महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आणि जीआरएसई यांच्यात हा करार झाला. हा करार भारताने बांगलादेशला दिलेल्या ५०० मिलियन डॉलर्सच्या संरक्षण कर्ज योजनेअंतर्गत पहिला मोठा प्रकल्प होता.
टग बोट ६१ मीटर लांब असणार होती आणि तिचा कमाल वेग पूर्ण लोडिंगसह १३ नॉट्स म्हणजेच सुमारे २४ किमी/तास असणार होता. करारानुसार, ते २४ महिन्यांच्या आत बांधून द्यायचे होते. या करारासह, भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनीही बांगलादेशला भेट दिली होती.
शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर भारतासोबतचे संबंध बिघडले
बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती ऑगस्ट २०२४ मध्ये बिघडली. तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी सत्ता सोडल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. नवीन सरकार आल्यापासून द्विपक्षीय प्रकल्प आणि सहकार्यात स्थिरता आली आहे. गेल्या काही वर्षांत भारताने बांगलादेशसोबत लष्करी सहकार्य मजबूत केले आहे, चीनच्या वाढत्या धोरणात्मक प्रभावाच्या पार्श्वभूमीवर, पण आता या निर्णयाकडे संबंधांमध्ये एक धक्का म्हणून पाहिले जात आहे. बांगलादेशने काही वर्षांपूर्वी चीनकडून पहिली डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी घेतली होती.