भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून शनिवारी युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी यासंदर्भात घोषणा केली. यानंतर, आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट करत या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे.
"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तत्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवल्याबद्दल आणि चर्चेबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो," अशी पोस्ट बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये युनूस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचेही कौतुक केले आहे. "भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रभावीपणे मध्यस्थी केल्याबद्दल मी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचेही कौतुक करू इच्छितो," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
भारताच्या प्रत्युत्तरानं मोडलं पाकिस्तानचं कंबरडं - पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानचे अक्षरशः कंबरडे मोडेले. यानंतर पाकिस्तानने जगातील इतर देशांकडे भारतावर दबाव टाकण्यासाठी भीक मागतही सुरुवात केली होती. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे नष्ट केले होते. यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले त्याला भारताने चोख प्रत्यूत्तर दिले आणि ते सर्वच्या सर्व हवेतल्या हवेतच हाणून पाडले.
या संदर्भात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एक पोस्ट करत, अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी करार झाला, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्यानंतर, पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी युद्धबंदीची घोषणा केली. यावर भारतानेही सहमती दर्शवली.