बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 18:28 IST2025-12-22T18:26:43+5:302025-12-22T18:28:11+5:30
Bangladesh Violence: 18 डिसेंबर रोजी बांगलादेशात एका हिंदू तरुणाला झाडाला लटकवून जाळल्याची धक्कादायक घटना घडली.

बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
Bangladesh Violence: बांगलादेशच्या मयमनसिंह जिल्ह्यातील हिंदू युवक दीपू चंद्र दास याची जमावाने अमानुषपणे हत्या करून मृतदेह झाडाला बांधून जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले. या प्रकरणाच्या तपासात आता नवीन आणि महत्त्वाचा खुलासा झाला आहे. सुरुवातीला ही हत्या पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात कथित अपशब्द (ईशनिंदा) बोलल्यामुळे झाल्याचे सांगितले जात होते; मात्र पोलीस आणि रॅपिड अॅक्शन बटालियन यांच्या तपासात या आरोपांना कोणताही ठोस पुरावा आढळलेला नाही.
खरे कारण काय
मीडिया रिपोर्ट्समध्ये बांगलादेशी तपास यंत्रणांच्या हवाल्याने सांगितले जात आहे की, दीपू दास यांच्या हत्येमागे कारखान्यातील अंतर्गत वाद, प्रोडक्शन टार्गेट, ओव्हरटाइम आणि अलिकडील प्रमोशन परीक्षेमुळे निर्माण झालेली वैरभावना कारणीभूत ठरली.
फॅक्टरीतील संघर्षातून जमावाच्या ताब्यात
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, 27 वर्षीय दीपू चंद्र दास हे पायनियर निटवेयर्स लिमिटेड या गारमेंट फॅक्टरीत फ्लोअर मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी नुकतीच सुपरवायझर पदासाठीची प्रमोशन परीक्षा दिली होती. फॅक्टरीचे वरिष्ठ व्यवस्थापक साकिब महमूद याने सांगितले की, दुपारी सुमारे 5 वाजता काही कामगारांनी दीपूवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत फॅक्टरीत गोंधळ घातला. दीपू यांचे भाऊ अपु चंद्र दास यांनी सांगितले की, कामाच्या अटी, टार्गेट्स आणि कामगारांच्या लाभांवरून दीपू यांचे काही सहकाऱ्यांशी आधीपासून वाद सुरू होते.
18 डिसेंबर 2025 रोजी वाद वाढल्यानंतर फ्लोअर-इन-चार्जने दीपू यांना जबरदस्तीने राजीनामा द्यायला लावला आणि फॅक्टरीबाहेर काढून संतप्त जमावाच्या ताब्यात दिले.
मारहाण करून हत्या, मृतदेह जाळला
पोलीस माहितीनुसार, फॅक्टरीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर महामार्गाजवळ दीपू यांना बेदम मारहाण करण्यात आली. मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह झाडाला बांधून केरोसीन ओतून पेटवण्यात आला. या घटनेचे भीषण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
तपास अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ईशनिंदेचे आरोप फक्त तोंडी आहेत; आतापर्यंत कोणताही पुरावा मिळालेला नाही. कोणीही दीपूला धर्माविरोधात काही बोलताना ऐकले नाही; सोशल मीडियावरही कोणती पोस्ट नाही. ही घटना धार्मिक संतापातून नव्हे, तर नियोजनपूर्वक घडल्याचे दिसते.
12 जणांना अटक
या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांत फॅक्टरीचे फ्लोअर मॅनेजर आलमगीर हुसेन, क्वालिटी इन-चार्ज मिराज हुसेन अकोन आणि अनेक कामगारांचा समावेश आहे. तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता आहे.