बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 10:39 IST2025-12-26T10:38:45+5:302025-12-26T10:39:11+5:30
बांगलादेशात दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाची जमावाकडून करण्यात आलेल्या अमानुष हत्येप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे.

बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेच्या काळात अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटनांनी सीमा ओलांडली आहे. मयमनसिंह भागात दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाची जमावाकडून करण्यात आलेल्या अमानुष हत्येप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणातील चार मुख्य आरोपींनी गुरुवारी न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. ईशनिंदेचा आरोप करत जमावाने दीपूला आधी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला झाडाला बांधून जिवंत जाळले होते. या घटनेने संपूर्ण जग हादरले असून आता बांगलादेश पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली आहेत.
न्यायालयात काय घडलं?
तारिक हुसैन (१९), मानिक मिया (२०), निजामुल हक (२०) आणि अजमल छागिर (२६) या चार आरोपींनी मयमनसिंह मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात आपला जबाब नोंदवला. हे चौघेही त्याच फॅक्टरीमध्ये काम करायचे जिथे दीपू दास कामाला होता. या आरोपींनी केवळ गुन्हा कबूल केला नाही, तर या हत्याकांडात सामील असलेल्या इतरही काही जणांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अब्दुल्लाह अल मामुन यांनी सांगितले की, "आरोपींनी कलम १६४ अंतर्गत दिलेला जबाब अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे तपासाला नवी दिशा मिळाली आहे."
कट नव्हता, पण जमावाचा क्रूरपणा!
पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात असे वाटत होते की, ही हत्या एका मोठ्या कटाचा भाग आहे. मात्र, तपासाअंती ही घटना अचानक चिडलेल्या जमावाच्या रागाचा परिणाम असल्याचे समोर येत आहे. "ही कोणतीही पूर्वनियोजित योजना नव्हती, मात्र घटनास्थळी जमा झालेली गर्दी आणि पसरलेली अफवा यामुळे हे क्रूर हत्याकांड घडले," असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ईशनिंदेच्या एका कथित आरोपावरून जमावाने दीपूला रात्री ९ च्या सुमारास पकडले आणि अमानुष छळ करून संपवले.
हिंसेचे सत्र थांबेना
आणखी एका तरुणाची हत्या दीपू चंद्र दासच्या हत्येचे प्रकरण शांत होत नाही तोच, बांगलादेशात अमृत मंडल उर्फ सम्राट (२९) या दुसऱ्या एका अल्पसंख्याक तरुणाची जमावाने मारून मारून हत्या केली आहे. स्थानिक लोकांनी अमृतवर खंडणी मागितल्याचा आरोप केला आणि कायद्याला हातात घेत त्याची हत्या केली. बांगलादेशातील वाढत्या हिंसेमुळे आणि अल्पसंख्याकांना टार्गेट केले जात असल्यामुळे तिथल्या हिंदू समुदायामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
पुढील कारवाई काय?
या प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या इतर सहा आरोपींना शुक्रवारी (२६ डिसेंबर) पोलीस कोठडीत घेतले जाणार आहे. बांगलादेश सरकार आणि तिथले प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करत असल्याचे म्हटले जात आहे.