बांगलादेशात जमावाचा राडा, संगीत कार्यक्रमात दगडफेक; २० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:48 IST2025-12-28T11:48:15+5:302025-12-28T11:48:40+5:30
रॉक गायक जेम्सचा कार्यक्रम रद्द, सांस्कृतिक संघटनांच्या कार्यक्रमांना केले जात आहे लक्ष्य...

बांगलादेशात जमावाचा राडा, संगीत कार्यक्रमात दगडफेक; २० जखमी
ढाका : बांगलादेशातील फरिदपूर येथे शुक्रवारी रात्री एका रॉक संगीताच्या कार्यक्रमात जमावाने केलेल्या हल्ल्यात २० विद्यार्थी जखमी झाल्याने प्रसिद्ध रॉक गायक जेम्स यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला. ‘जेम्स’ या नावाने प्रसिद्ध असलेले बांगलादेशी गायक-गीतकार फारूक महफूज अनम जेम्स यांनी अनेक ‘हिट’ हिंदी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. अलीकडच्या काळात बांगलादेशातील सांस्कृतिक संघटनांच्या कार्यक्रमांना लक्ष्य केले जात आहे. पोलिसांनी या संदर्भात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.
जेम्स यांचा हा संगीत कार्यक्रम फरिदपूर जिल्हा शाळेच्या १८५व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केला होता. स्थानिक वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच काहीजणांना प्रवेश नाकारल्यानंतर गोंधळ माजला. यात जमावाने दगड-विटा फेकून मंचाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यात शाळेतील विद्यार्थ्यांनी हल्लेखोरांचा प्रतिकार केला; पण दगडफेकीत २० मुले जखमी झाली. नंतर आयोजकांनी कार्यक्रम रद्द केला.
तारिक रहमान यांची हादीच्या कबरीला भेट
बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे काळजीवाहू अध्यक्ष तारिक रहमान यांनी शनिवारी तरुण नेता शरीफ उस्मान हादी याच्या कबरीला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. रहमान यांच्या या भेटीवेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रहमान यांनी बांगलादेशचे राष्ट्रीय कवी नजरुल इस्लाम यांच्या कबरीलाही भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कोण आहेत जेम्स : जेम्स हे बांगलादेशी रॉक बँड ‘नगर बाउल’चे मुख्य गायक, गीतकार आणि गिटारवादक आहेत. त्यांनी ‘गँगस्टर’, ‘वो लम्हे’ आणि ‘लाइफ इन अ… मेट्रो’ यांसारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांत गाणी गायली आहेत.
१७ वर्षांनंतर रहमान पुन्हा मतदारयादीत
ढाका : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे काळजीवाहू अध्यक्ष तारिक अहमद यांनी शनिवारी बांगलादेशच्या मतदार यादीत स्वतःचे नाव नोंदवले. या नोंदीमुळे त्यांना मतदान कार्ड मिळणार आहे. सुमारे १७ वर्षांहून अधिक काळ रहमान हे लंडनमध्ये राहात होते.
शनिवारी सकाळी ते बांगलादेशच्या निवडणूक आयोग कार्यालयात गेले. तेथे त्यांनी बायोमेट्रिक नोंदणी केली. या नोंदीआधी रहमान यांनी मतदारयादीत ऑनलाइन नाव दाखल केले होते.
त्यांना आता २४ तासानंतर मतदान कार्ड मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. रहमान येणार म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.