बांगलादेशातील अल्पसंख्याकांची स्थिती भारतापेक्षा चांगली; हंगामी सरकारमधील मंत्र्याचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 14:32 IST2024-08-26T14:32:02+5:302024-08-26T14:32:45+5:30
"बांगलादेश हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, कट्टरतावादी नाही," असेही मंत्री

बांगलादेशातील अल्पसंख्याकांची स्थिती भारतापेक्षा चांगली; हंगामी सरकारमधील मंत्र्याचे विधान
Bangladesh Minorities, India: बांगलादेशमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर हंगामी सरकार स्थापन झाले आहे. याच सरकारमधील अल्पसंख्याक व्यवहार मंत्री खालिद हुसेन हे देशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबद्दल बोलले. क्रांती आणि राजकीय बदल घडत असताना अशी परिस्थिती निर्माण होते. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे गैरप्रकार करणारे समाजकंटक सक्रिय होऊ शकतात. हे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. बांगलादेशातील अल्पसंख्याकांची स्थिती भारतातील अल्पसंख्याकांपेक्षा चांगली आहे. बांगलादेशात जातीय सलोखा राखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
"अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराची प्रकरणे फार मोठी नाहीत. बांगलादेशी हिंदूंचा सरकारवर विश्वास आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर एकही हिंदू बांगलादेशातून भारतात गेला नाही. यावरूनच बांगलादेशात त्यांना सुरक्षित वाटते हे दिसून येते. जन्माष्टमी आणि दुर्गापूजेदरम्यान सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेची कोणतीही समस्या नाही. बांगलादेशातील अल्पसंख्याकांची स्थिती भारतातील अल्पसंख्याकांपेक्षा चांगली आहे," असे सडेतोड मत त्यांनी व्यक्त केले.
"बांगलादेश हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, कट्टरतावादी नाही. बांगलादेशी राज्यघटना कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व धार्मिक धर्माच्या नागरिकांना समान अधिकार प्रदान करते. देशातील धार्मिक व्यवहार मंत्रालयाने हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन लोकांसाठी कल्याण ट्रस्ट तयार केले आहेत. जातीय सलोखा राखण्यासाठी आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करत आहोत. अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी बांगलादेशातील उपजिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत," असेही ते म्हणाले.