"उद्या देश हादरून जाईल"; हादीच्या हत्येआधीच हल्लेखोराने प्रेयसीला दिली होती कल्पना, आता महाराष्ट्रात लपल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:18 IST2025-12-19T18:16:47+5:302025-12-19T18:18:38+5:30
भारतविरोधी नेता हादीचा सिंगापूरमध्ये मृत्यू झाल्यापासून बांगलादेशात हिंसाचार सुरु झाला.

"उद्या देश हादरून जाईल"; हादीच्या हत्येआधीच हल्लेखोराने प्रेयसीला दिली होती कल्पना, आता महाराष्ट्रात लपल्याची चर्चा
Bangladesh Violence: भारतविरोधी कट्टरपंथी नेता शरीफ ओस्मान हादी याचा सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण बांगलादेशात हिंसाचाराचा वणवा पेटला आहे. गुरुवारी रात्रीपासून बांगलादेशात अराजकता माजली असून आंदोलकांनी प्रसारमाध्यमांची कार्यालये, सांस्कृतिक केंद्रे आणि चक्क शेख मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानाला आग लावली आहे. या गोंधळात एका हिंदू व्यक्तीची ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने निर्घृण हत्या करून त्याला जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
काय घडले होते हादीसोबत?
गेल्या आठवड्यात ढाका येथे दुचाकीवरून आलेल्या बुरखाधारी हल्लेखोरांनी शरीफ ओस्मान हादी याच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार केला होता. एक गोळी हादीच्या कानातून आरपार गेली होती. अत्यंत गंभीर अवस्थेत हादीला रुग्णवाहिकेने सिंगापूरला नेण्यात आले होते, जिथे अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याचा अंत झाला. शरीफ ओस्मान हादी हा अँटी-शेख हसीना इंकलाब मंचाचा प्रवक्ता आणि ढाका-८ मतदार संघातील अपक्ष उमेदवार होता.
या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार फैसल करीम याने हल्ल्याच्या एक रात्रीपूर्वीच आपल्या प्रेयसी मारिया अख्तर लिमाला सूचक इशारा दिला होता. सावर येथील एका रिसॉर्टमध्ये थांबलेले असताना फैसल म्हणाला होता की, "उद्या (शुक्रवारी) असे काहीतरी घडेल की संपूर्ण देश हादरून जाईल." तपासादरम्यान मारियाने ही माहिती पोलिसांना दिली आहे.
तपासातील खळबळजनक खुलासे
बांगलादेशच्या तपास यंत्रणांच्या मते, हा हल्ला अत्यंत सुनियोजित कट होता. एका माजी नगरसेवकाने या हत्येचा कट रचल्याचा संशय आहे. यात पैसा पुरवण्यापासून ते शस्त्रे आणण्यापर्यंत किमान २० जणांचा सहभाग होता. पोलिसांनी छाप्यात परदेशी बनावटीची पिस्तुलं, जिवंत काडतुसे आणि कोट्यवधी टक्यांचे चेक जप्त केले आहेत. हल्ल्यासाठी वापरलेल्या दुचाकीवर बनावट नंबर प्लेट होती, जी फैसलच्या वडिलांनी बदलली होती.
आरोपी भारतात पळाले?
मुख्य हल्लेखोर फैसल करीम आणि त्याचे सहकारी अद्याप फरार आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, फैसल भारतात पळून गेला आहे. तो सुरुवातीला गुवाहाटीमध्ये होता आणि आता तो महाराष्ट्रात असल्याची चर्चा आहे. तसेच तो रिलायन्स जिओचे सिमकार्ड वापरत असल्याचा दावा जमुना टेलिव्हिजनने केला आहे. मात्र, ढाका पोलिसांनी याला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, फेब्रुवारी २०२६ मध्ये बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच हादीच्या मृत्यूनंतर मोहम्मद युनूस सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. देशात भीतीचे वातावरण असून जातीय हिंसाचारामुळे अल्पसंख्याक समुदायामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.