‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 05:56 IST2025-12-25T05:56:29+5:302025-12-25T05:56:46+5:30
१८ डिसेंबर रोजी बांगलादेशातील मयमेनसिंह जिल्ह्यातील बालुका येथे ईशनिंदेच्या आरोपावरून कापड कारखान्यातील कामगार दीपुचंद्र दास यांना जमावाने ठार मारले. त्यानंतर त्यांचा मृतदेह जाळण्यात आला.

‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
कोलकाता : बांगलादेशमध्ये गेल्या आठवड्यात ईशनिंदेच्या आरोपावरून हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ भारत-बांगलादेश सीमेवरील बंदरांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शने केली. गेल्या आठवड्यात जमावाकडून हत्या करण्यात आलेल्या हिंदू व्यक्तीच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय बांगलादेशमधील हंगामी सरकारने घेतला.
१८ डिसेंबर रोजी बांगलादेशातील मयमेनसिंह जिल्ह्यातील बालुका येथे ईशनिंदेच्या आरोपावरून कापड कारखान्यातील कामगार दीपुचंद्र दास यांना जमावाने ठार मारले. त्यानंतर त्यांचा मृतदेह जाळण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ हावडा जिल्ह्यात आंदोलन करणारे भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली.
आम्हाला न्याय हवा; दीपुचंद्र दास यांच्या वडिलांची मागणी
शिक्षण खात्याचे सल्लागार सी. आर. अब्रार यांनी सांगितले की, दीपुचंद्र दास यांचा मुलगा, पत्नी आणि पालकांची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली आहे. दास यांची हत्या ही अतिशय अमानुष घटना आहे. दास यांचे वडील रवीचंद्र दास यांनी आपल्या मुलाच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
अवामी लीग पक्षावरील बंदी, अमेरिकेत चिंता व्यक्त
पुढील वर्षात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी बांगलादेशात अवामी लीग या पक्षावर तेथील हंगामी सरकारने बंदी घातली आहे. त्याबद्दल अमेरिकी लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली.
अमेरिकी लोकप्रतिनिधींनी बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना मंगळवारी एक पत्र पाठविले. त्यात मुक्त व निष्पक्ष निवडणुकांद्वारे सरकार निवडण्याचा बांगलादेशातील जनतेला अधिकार मिळायलाच हवा, असे म्हटले.
मोर्चा अडवला
भाजप कार्यकर्त्यांचा मोर्चा हावडा ब्रीजकडे जाण्यापूर्वीच रोखल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. आंदोलकांनी रस्ता अडवला व बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला.