बांगलादेशच्या इतिहासात पहिल्यांदाच ढाक्यातून हिंदू उमेदवाराचा विजय; कोण आहेत गयेश्वर चंद्र रॉय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:54 IST2026-02-13T12:52:32+5:302026-02-13T12:54:10+5:30
Bangladesh Election : गयेश्वर चंद्र रॉय यांनी स्वातंत्र्यानंतर (1971 नंतर) ढाकातून निवडून आलेले पहिले हिंदू खासदार होण्याचा मान पटकावला आहे.

बांगलादेशच्या इतिहासात पहिल्यांदाच ढाक्यातून हिंदू उमेदवाराचा विजय; कोण आहेत गयेश्वर चंद्र रॉय?
Bangladesh Election : बांगलादेशातूनहिंदू समाजासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या 13व्या संसदीय निवडणुकीत ढाका मतदारसंघातून गयेश्वर चंद्र रॉय यांनी विजय मिळवत, स्वातंत्र्यानंतर (1971 नंतर) ढाकातून निवडून आलेले पहिले हिंदू खासदार होण्याचा मान पटकावला आहे. त्यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या तिकिटावर निवडणूक लढवत जमात-ए-इस्लामीचे उमेदवार शाहिनुर इस्लामचा पराभव केला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ढाकाचे रिटर्निंग ऑफिसर आणि जिल्हाधिकारी एमडी रेजाउल करीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गयेश्वर चंद्र रॉय (BNP) यांना 98,785 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील शाहिनुर इस्लाम (जमात-ए-इस्लामी) यांनी 82,232 मते मिळवली.
कोण आहेत गयेश्वर चंद्र रॉय?
गयेश्वर चंद्र रॉय हे BNP चे वरिष्ठ नेते असून दीर्घकाळापासून अल्पसंख्याक हक्कांवर ठामपणे भूमिका मांडणारे म्हणून ओळखले जातात. ढाका-3 या महत्त्वाच्या मतदारसंघातून त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिला असून, या मतदारसंघातून निवडून येणारे ते पहिले हिंदू खासदार ठरले आहेत. त्यांच्या विजयामुळे हिंदू संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जमात-ए-इस्लामीला धक्का...
जमात-ए-इस्लामीने यावेळी आपला एकमेव हिंदू उमेदवार कृष्ण नंदी यांना खुलना-1 (दाकोप–बोटियाघाटा) येथून मैदानात उतरवले होते. मात्र, त्यांचा 50 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला. त्या जागेवर BNP चे अमीर एजाज खान विजयी झाले. या निवडणुकीत हिंदू मतदारांचा सहभाग लक्षणीय असल्याचे दिसून आले. गयेश्वर चंद्र रॉय यांचा विजय BNP च्या समावेशक राजकीय प्रतिमेला बळ देणारा मानला जात आहे.
हसीना सरकार कोसळल्यानंतर बांग्लादेशात पहिल्यांदाच निवडणूक -
2024 मधील विद्यार्थी आंदोलनानंतर आणि शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांग्लादेशात पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शेख हसीना यांचा 'आवामी लीग' पक्ष मैदानाबाहेर होता. यामुळे मुख्य लढत बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी यांच्यातच बघायला मिळाली. एकूण 299 जागांवर मतदान झाले. एकाच्या मृत्यूमुळे एक जागा रद्द करण्यात आली होती. 299 जागांपैकी बीएनपी 200 पेक्षा जास्त जागा जिंकत आहे.