नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 23:16 IST2025-12-24T23:15:35+5:302025-12-24T23:16:12+5:30
Blast In Dhaka: तीव्र आंदोलनानंतर गतवर्षी झालेल्या सत्तांतरापासून बांगलादेशमध्ये निर्माण झालेली अस्थिरता आणि हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथील मोघबाजारामध्ये काही समाजकंटकांनी पेट्रोल बॉम्बद्वारे स्फोट घडवून आणले. या स्फोटामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
तीव्र आंदोलनानंतर गतवर्षी झालेल्या सत्तांतरापासून बांगलादेशमध्ये निर्माण झालेली अस्थिरता आणि हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथील मोघबाजारामध्ये काही समाजकंटकांनी पेट्रोल बॉम्बद्वारे स्फोट घडवून आणले. या स्फोटामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
या स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा नाव सैफुल सियाम असं आहे. रात्री सातच्या सुमारास वायरलेस गेट एरियाजवळ बांगलादेश फ्रीडम फायटर्स कौन्सिलच्या समोर हा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा बॉम्ब फ्लायओव्हरवरून फेकण्यात आला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांचे उपायुक्त मसूद आलम यांनी सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये हा बॉम्ब फ्लायओव्हरवरून फेकण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र या हल्ल्यामागचा हेतू अद्याप समोर आलेला नाही. कदाचित हा बॉम्ब थेट सैफूलवर जाऊन पडला. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. आता सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून दोषींची ओळख पटवली जात आहे.
दरम्यान, या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सैफुल याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार सैफूल एका फॅक्टरीमध्ये काम करायचा. तसेच हल्ला झाला तेव्हा घटनास्थळी होता. आता पोलिसांनी परिसराला घेराव घातला असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच हा हल्ला जिथे झाला तिथून जवळच दोन मोठे चर्च असल्याची माहिती समोर आली आहे.