बलूच बंडखोरांनी मोठ्या बँकेवर कब्जा केला अन् उडवून दिली; १० जिल्ह्यांत रणकंदन, बँका लुटल्या अन् पोलीस ठाणी पेटवली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 21:08 IST2026-01-31T21:08:11+5:302026-01-31T21:08:28+5:30
बलूचिस्तानमध्ये BLA चा मोठा लष्करी हल्ला. क्वेटात बँक उडवली, पोलीस ठाण्यांवर कब्जा. १० पाकिस्तानी सैनिक ठार. जाणून घ्या काय आहे 'ऑपरेशन हेरॉफ २.०'.

बलूच बंडखोरांनी मोठ्या बँकेवर कब्जा केला अन् उडवून दिली; १० जिल्ह्यांत रणकंदन, बँका लुटल्या अन् पोलीस ठाणी पेटवली!
पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात शनिवारी बलोच बंडखोरांनी पुकारलेल्या 'स्वातंत्र्य युद्धा'ने भीषण रूप धारण केले आहे. 'बलोच लिबरेशन आर्मी'ने (BLA) 'ऑपरेशन हेरॉफ २.०' अंतर्गत एकाच वेळी १० हून अधिक जिल्ह्यांमध्ये भीषण हल्ले केले आहेत. या कारवाईने केवळ शाहबाज शरीफ सरकारच नाही, तर रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयात बसलेले लष्करप्रमुख आसिम मुनीर यांचीही झोप उडवली आहे.
या ऑपरेशनमधील सर्वात धक्कादायक घटना क्वेटा शहरात घडली. बलोच बंडखोरांनी येथील 'फैजल बँक'च्या इमारतीवर ताबा मिळवला. बँकेतील लाखो रुपयांची रोकड आणि मौल्यवान साठा लुटल्यानंतर, बंडखोरांनी संपूर्ण इमारत मोर्टार आणि रॉकेटने उडवून दिली. या स्फोटाच्या तीव्रतेने संपूर्ण क्वेटा शहर हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलीस ठाणी आणि लष्करी तळांवर ताबा
BLA ने जारी केलेल्या माहितीनुसार, त्यांचे लढाऊ सैन्य आता केवळ हल्ले करत नसून शहरांवर ताबा मिळवत आहेत. नुश्की येथील काउंटर टेररिझम डिपार्टमेंटच्या मुख्यालयावर बंडखोरांनी कब्जा केला आहे. क्वेटा येथील सरियाब न्यू पोलीस स्टेशन आणि इस्टर्न बायपास पोलीस स्टेशनवर ताबा मिळवून पोलिसांची वाहने पेटवून देण्यात आली आहेत. मस्तुंग येथील पोलीस ठाण्यावर कब्जा करून बंडखोरांनी कैद्यांची सुटका केली आहे. ग्वादर आणि पसनी भागातील चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरशी (CPEC) संबंधित महत्त्वाच्या केंद्रांवरही हल्ले झाले आहेत.
हानी आणि दावे
या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत पाकिस्तानचे १० सुरक्षा रक्षक मारले गेल्याची पुष्टी झाली आहे, तर ६० हून अधिक बंडखोरांना ठार केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. बलोच नेते बशीर जेब बलोच यांनी एका व्हिडिओद्वारे या मोहिमेची घोषणा करत, जोपर्यंत पाकिस्तानचा 'कब्जा' हटत नाही, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील, असा इशारा दिला आहे.