बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 18:02 IST2025-10-25T18:00:05+5:302025-10-25T18:02:50+5:30
पाकिस्तानने इस्लामिक जगताची एकता आणि प्रगतीविरोधात काम केले आहे हे इतिहासाने दाखवून दिले असं बलूच नेत्याने आरोप केला.

बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
इस्लामाबाद - पाकिस्तानी सैन्य सध्या दुहेरी कात्रीत सापडले आहे. खैबर पख्तूनख्वा येथे तहरीक ए तालिबानने मुनीर सैन्याविरोधात मोर्चा उघडला आहे तर बलूचिस्तान येथे सशस्त्र बलूच बंडखोरांनी सातत्याने हल्ले सुरू ठेवले आहेत. त्यातच एका बलूच नेत्याने पाकिस्तानवर गंभीर आरोप केला आहे. पाकिस्तानी सैन्य नेतृत्व डबल गेम खेळत असल्याचा दावा बलूच नेते मीर यार बलूच यांनी केला. त्याशिवाय पाकिस्तान इस्लामिक एकतेविरोधात काम करत असल्याचा दावा करत गैर मुस्लीम ताकदीचा एजेंट बनून काम करत असल्याचा आरोप केला आहे.
मीर यार बलूच यांनी सांगितले की, पाकिस्तानचे पंजाबी जनरल पाश्चात्य जगाच्या दहशतवादाविरुद्धच्या युद्धात भागीदार असल्याचे भासवतात तर दुसरीकडे गुप्तपणे कट्टरपंथी नेटवर्कसोबत हितसंबंध जोपासत आहेत. दहशतवादाविरुद्ध लढण्याऐवजी पाकिस्तानी जनरलनी अब्जावधी डॉलर्सची लष्करी आणि विकास निधी हडपला, त्याचा वापर सत्तेवरील त्यांची पकड मजबूत करण्यासाठी आणि दक्षिणेतील प्रॉक्सी युद्धांना निधी देण्यासाठी केला असं त्यांनी सांगितले.
इस्लामिक एकतेविरोधात पाकिस्तान
पाकिस्तानने इस्लामिक जगताची एकता आणि प्रगतीविरोधात काम केले आहे हे इतिहासाने दाखवून दिले. पाकिस्तानने कायम गैर मुस्लीम ताकदींचे एजेंट बनून काम केले. पाकिस्तान सध्या अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत अडकला आहे. २६ ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त परकीय कर्जाच्या ओझ्याने पाकिस्तान दबलेला आहे. त्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे आंतरराष्ट्रीय कर्जात अडकलेली आहे असंही मीर यार बलूच यांनी म्हटलं.
दरम्यान, आता जगाला पाकिस्तानशी नाते तोडायला हवे आणि त्यांच्या हुकुमशाही सैन्याला फंडिंग देणे बंद करायला हवे. सोबतच बलूचिस्तानला गणराज्य म्हणून मान्यता द्यावी आणि त्यात गुंतवणूक करावी. जिथे नैसर्गिक साधने, संपत्तीने भरलेला हा प्रदेश आहे असंही आवाहन जागतिक समुदायाला बलूच नेत्याने केले आहे.