बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 16:47 IST2026-04-13T16:45:58+5:302026-04-13T16:47:03+5:30
ओली यांच्या कारकिर्दीत भारत आणि नेपाळ संबंध बिघडले होते. त्यातून ओली यांना चीनचा माणूस अशी प्रतिमा तयार झाली.

बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
काठमांडू - नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झालं असून बालेन शाह पंतप्रधान बनले आहेत. नेपाळ सरकारचे नवे पंतप्रधान सर्वात आधी भारताचा दौरा करतात ही जुनी परंपरा आहे. बालेन शाहदेखील ही परंपरा कायम ठेवणार आहेत. परंतु ते जुन्या पंतप्रधानांप्रमाणे भारतीय पंतप्रधानांची केवळ औपचारिक भेट घेणार नाहीत तर त्यांनी भारतासमोर काही अटी ठेवल्या आहेत.
नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी याची पुष्टी करत म्हटलंय की, भारत आणि नेपाळचे अधिकारी अशा मुद्द्यांवर काम करत आहेत ते अंतिम झाल्यानंतर बालेन शाह दिल्ली दौरा करतील. पंतप्रधान बालेन शाह यांना भारतीय पंतप्रधानांकडून भारतात येण्याचं आमंत्रण मिळाले आहे आणि त्यांनी ते स्वीकारले आहे. परंतु बालेन शाह पंतप्रधान मोदींना केवळ भेटणार नाहीत तर या भेटीतून काही फलित निघेल असा संवाद त्यांना साधायचा आहे. केपी शर्मा ओली यांच्या कार्यकाळात नेपाळ आणि भारताचे संबंध खूप बिघडले होते. परंतु आता नेपाळमधील नवे सरकार भारतासोबत संबंध पुन्हा रुळावर आणण्याच्या तयारीत आहे.
ओली यांच्या कारकिर्दीत भारत आणि नेपाळ संबंध बिघडले होते. त्यातून ओली यांना चीनचा माणूस अशी प्रतिमा तयार झाली. ओली यांच्या आडकाठी भूमिकांमुळे हे संबंध ताणले गेले होते. आता पंतप्रधान बालेन शाह भारतासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दौरा करत आहेत, जेणेकरून या भेटीतून काहीतरी साध्य होईल. भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध सुधारण्याबाबत अनेक मुद्द्यांवर ते मोदींसोबत चर्चा साधतील असं नेपाळी परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले.
नेपाळसोबत संबंध का बिघडले?
ओली यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात नेपाळमध्ये संविधानात दुरुस्ती करून नवीन नकाशा प्रसिद्ध केला होता. ज्यात कालापानी, लिम्पियाधुरा आणि लिपुलेख या भारतीय भागांचा समावेश नेपाळमध्ये केला होता. ओली यांनी नेपाळी लोकांना भारतीयांविरोधात भडकावले होते. भारताच्या राष्ट्रीय प्रतिकाचा अपमान ओली यांनी केला होता. प्रभू रामांचा जन्म भारतात नाही तर नेपाळमध्ये झाल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु ओली आता इतिहासजमा झालेत. नेपाळच्या राजकारणात नवे लोक आलेत. त्यांना भारतासोबत संबंध कसे ठेवायचे आहेत हे ठरवायचे आहे.
बालेन शाह यांच्या नेतृत्वात नेपाळमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचं सरकार बनले आहे. भारतासोबत त्यांना संबंध सुधारण्याची इच्छा आहे. ते भारताकडे एक अतिरिक्त हवाई मार्गाची मागणी करू शकतात. जेणेकरून नेपाळ जगातील इतर भागाशी सहज हवाई संपर्क ठेवेल. लिपुलेखच्या मार्गाने होणाऱ्या व्यापारावरही चर्चा होईल. त्यामुळे बालेन शाह यांच्या दौऱ्यात नेपाळला काय मिळते हे पाहणे गरजेचे आहे.