'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 21:14 IST2025-10-09T21:13:02+5:302025-10-09T21:14:19+5:30
Azerbaijan Plane Crash News: गतवर्षी २०२४ मध्ये अझरबैजानमध्ये एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. जेव्हा हे विमान कोसळले तेव्हापासून या अपघाताबाबत अनेक शंका कुशंका घेतल्या जात होत्या. तसेच हा अपघात कसा घडला असावा, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते.

'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
गतवर्षी २०२४ मध्ये अझरबैजानमध्ये एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. जेव्हा हे विमान कोसळले तेव्हापासून या अपघाताबाबत अनेक शंका कुशंका घेतल्या जात होत्या. तसेच हा अपघात कसा घडला असावा, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी या अपघाताबाबत मोठा गौप्यस्पोट केला आहे. या विमान दुर्घटनेत रशियाचा हात होता, अशी कबुली पुतीन यांनी दिली आहे.
अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलियेव यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले की, ही दुर्घटना घडली त्या दिवशी सकाळी रशियाने युक्रेनचे ड्रोन नष्ट करण्यासाठी क्षेपणास्त्रे तैनात केली होती. तसेच ही क्षेपणास्त्रे या विमानापासून काही मीटर अंतरावर फुटली. रशिया अशा दु:खद घटनांमध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी शक्यतोपरी प्रयत्न करेल. तसेच सर्व अधिकाऱ्यांच्या कामाचं कायदेशीर मूल्यांकनही केलं जाईल, असेही पुतीन यांनी सांगितले.
पुतीन पुढे म्हणाले की, जी क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती ती थेट विमानावर आदळली नाहीत. जर असं झालं असतं तर हे विमान तिथेच दुर्घटनाग्रस्त झालं असतं. रशियाच्या हवाई वाहतूक नियंत्रकांनी या विमानाच्या वैमानिकाला हे विमान मखचकाला येथे उतरवण्याच सल्ला दिला होता. मात्र वैमानिकाने हे विमान अझरबैजानमध्ये किंवा कझाकस्तानमध्ये नेऊन उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान ते कोसळले, असेही पुतीन म्हणाले.
गतवर्षी २५ डिसेंबर रोजी अझरबैजान एअरलाइन्सचं एक विमान कझाकिस्तानमध्ये कोसळलं होतं. हे विमान रशियातील ग्रोजनी शहरात उतरणार होते. मात्र तत्पूर्वीच झालेल्या दुर्घटनेत विमान कोसळून त्यातील ६७ प्रवाशांपैकी ३८ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, रशिया या दुर्घटनेमागचं खरं कारण लपवत असल्याचा आरोप अझरबैजानचे राष्ट्रपती अलइयोव यांनी केला होता. दरम्यान, गुरुवारी झालेल्या बैठकीत दुर्घटनेबाबत खरी माहिती दिल्याने त्यांनी पुतीन यांचे आभार मानले आहेत.