"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 08:54 IST2025-08-22T08:53:56+5:302025-08-22T08:54:13+5:30
रशियाच्या तेल खरेदीवरून भारतावर व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी हल्लाबोल केला आहे.

"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
Peter Navarro on India-US Relations: अमेरिकेने भारतावर अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केल्यापासून, अमेरिकन अधिकारी आणि नेत्यांकडून भारताविरोधात सातत्याने वक्तवे येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर टीकास्त्र डागलं आहे. त्यांनी भारतावर रशियन तेल खरेदी करून ते रिफायनरीजमध्ये नफ्यासाठी वापरत असल्याचा आरोप केला आहे. यासोबत त्यांनी भारत-चीन संबंधांवरही प्रतिक्रिया दिली. भारत आजकाल चीनच्या जवळ येत असल्याचे पीटर नवारो म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारतावर पुन्हा २५ टक्के कर लादला जो २७ ऑगस्टपासून लागू होईल. रशियाकडून तेल खरेदी करून भारत युक्रेनमधील संघर्षाला चालना देत असल्याचा दावा सातत्याने ट्रम्प प्रशासन करत आहे. आता ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनीही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आरोपांना दुजोरा देत भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. भारताविरुद्ध बोलताना नवारो म्हणाले की तेल खरेदी करून भारत रशियाला युक्रेनशी युद्ध सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. नवारो यांनी आरोप केला की भारत क्रेमलिनसाठी कपडे धुण्याचे दुकान बनले आहे. रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे, ते शुद्ध करणे आणि ते जास्त किमतीत विकणे ही प्रक्रिया अप्रत्यक्षपणे युक्रेन युद्धाला मदत करत आहे असे नवारो म्हणाले.
जर भारताने त्यांच्या धोरणांवर पुनर्विचार केला नाही तर पुढील आठवड्यात अमेरिकेचे शुल्क दुप्पट होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. "भारताला देशांतर्गत अर्थव्यवस्था चालवण्यासाठी रशियन तेलाची आवश्यकता आहे असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा भारताने रशियाकडून १ टक्के देखील तेल खरेदी केले नाही. पण युद्ध सुरू होताच भारताकडून खरेदी अचानक वाढली. भारत व्यापारातून मिळणारा नफा रशियन तेल खरेदीमध्ये गुंतवत आहे, ज्यामुळे मॉस्कोची लष्करी ताकद वाढत आहे. रशिया कच्च्या तेलावर मोठ्या प्रमाणात सवलती देऊन भारतीय रिफायनर्स त्यांच्यासोबत भागीदारी करून आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये उच्च किमतीत रिफाइंड उत्पादने विकत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया रशियन युद्धयंत्रणेला निधी पुरवत आहे. अशा प्रकारे दररोज दहा लाख बॅरलपेक्षा जास्त तेल विकले जात आहे," असं पीटर नवारो म्हणाले.
"भारतातावर २५ टक्के शुल्क लावण्यात आले कारण ते व्यापारात आमची फसवणूक करत आहेत. त्यानंतर २५ टक्के शुक्ल रशियन तेलामुळे लावण्यात आलं. भारताचे शुक्ल हे महाराजा शुल्क आहे. भारत आम्हाला वस्तू विकून आमच्याकडून मिळणारे पैसे रशियन तेल खरेदी करण्यासाठी वापरत आहे ज्याच्यातून नंतर भरपूर पैसे कमवले जात आहेत. नंतर रशियन लोक अधिक शस्त्रे तयार करण्यासाठी आणि युक्रेनियन लोकांना मारण्यासाठी हे पैसे वापरत आहेत. भारताने हे समजून घेतले पाहिजे की त्यांचा आर्थिक व्यवहार हा केवळ व्यापारा पुरता नाहीतर तर युद्ध आणि शांततेबाबतही आहे. शांततेचा मार्ग नवी दिल्लीतून जातो," असेही नवारो म्हणाले.
"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक चांगले नेते आहेत, पण भारताने जागतिक अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे. ते शांततेऐवजी युद्धाला प्रोत्साहन देत आहे. यामुळे भारताचे अमेरिकेशी असलेले २५ वर्षांचे संबंध बिघडत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी शक्य तितक्या लवकर पंतप्रधान मोदींशी बोलले पाहिजे जेणेकरून हे आपत्तीचे रूप घेऊ नये," अस नवारो यांनी म्हटलं.