ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 11:06 IST2025-11-02T11:05:40+5:302025-11-02T11:06:12+5:30
Britain News: ब्रिटनमधील केंब्रिजशायर येथे एका धावत्या ट्रेनमध्ये चाकूहल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी संध्याकाळी धावत्या ट्रेनमध्ये अचानक हा हल्ला झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. तसेच ट्रेनमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, या चाकूहल्ल्यात अनेक प्रवासी जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.

ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत
ब्रिटनमधील केंब्रिजशायर येथे एका धावत्या ट्रेनमध्ये चाकूहल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी संध्याकाळी धावत्या ट्रेनमध्ये अचानक हा हल्ला झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. तसेच ट्रेनमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, या चाकूहल्ल्यात अनेक प्रवासी जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रेनला हंटिंगडन स्टेशनवर थांबवले आणि दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. याबरोबरच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना केंब्रिजशायर काँस्टेबुलरींनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी ७ वाजून ३९ मिनिटांच्या सुमारास एका ट्रेनमध्ये अनेक प्रवाशांवर चाकू हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही ट्रेन केंब्रिजशायर भागातून धावत होती. ही ट्रेन हंटिंगडन जवळ पोहोचताच पोलिसांनी तिला थांबवले. तसेच घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. हत्यारबंद पोलिसांनी ट्रेनमध्ये चढून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच घटनास्थळावरून दोन संशयित आरोपींनी अटक केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रवासांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले, असी माहिती पोलिसांनी दिली.
केंब्रिजशायर पोलीस आणि ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलीस यांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चाकू हल्ला करणाऱ्या आरोपींचा नेमका हेतू काय होता, ही बाब स्पष्ट होऊ शकलेली नाही. दरम्यान, हा हल्ला होताना ज्यांनी पाहिला किंवा मोबाईलवर रेकॉर्ड केला असेल, तर त्यांनी याची माहिती पोलिसांना द्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.