‘अभिव्यक्ती’वर अतिरेकी हल्ला!
By Admin | Updated: January 8, 2015 02:32 IST2015-01-08T02:32:03+5:302015-01-08T02:32:03+5:30
एके ५६ रायफली व रॉकेट लाँचर घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी फ्रान्सचे व्यंग साप्ताहिक ‘चार्ली हेब्डो’च्या पॅरिस येथील कार्यालयावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात बारा जण ठार व सात जण जखमी झाले.

‘अभिव्यक्ती’वर अतिरेकी हल्ला!
पॅरिसमध्ये साप्ताहिकावर हल्ला : संपादक, चार व्यंगचित्रकारांसह १२ जण ठार
पॅरिस : एके ५६ रायफली व रॉकेट लाँचर घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी फ्रान्सचे व्यंग साप्ताहिक ‘चार्ली हेब्डो’च्या पॅरिस येथील कार्यालयावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात बारा जण ठार व सात जण जखमी झाले.
साप्ताहिकाचे संपादक स्टीफनी चारर्बोनियर यांच्यासह चार व्यंगचित्रकार, सहा पत्रकार व दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या साप्ताहिकाने व्यंगचित्रे प्रसिद्ध केली होती. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोईस होलांद यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले आहे. या हल्ल्यानंतर २० देशांत फ्रान्सची दूतावास व सांस्कृतिक केंद्रे बंद करण्यात आली आहेत. सशस्त्र हल्लेखोरांनी घोषणा देत पॅरिसच्या व्यंगात्मक व तिरकस लेखनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या डाव्या विचारांच्या साप्ताहिकाच्या कार्यालयावर बुधवारी सकाळी ११.३० वाजता हल्ला केला. फ्रान्समध्ये गेल्या ४० वर्षात झालेला हा सर्वाधिक भीषण हल्ला आहे. इराक व सिरीयातील युद्धात सहभागी होण्यासाठी फ्रान्स व युरोपीयन देशाातील शेकडो युवक गेल्यामुळे देशात तणाव असताना हा हल्ला झाला आहे.
साप्ताहिकाचे मुख्य संपादक स्टिफनी चार्बोनिअर हे चार्ब या नावाने ओळखले जात असत, चार्ब व काबू, टिग्नोयस, वोल्स्कीनी हे व्यंगचित्रकार हल्ल्यात मरण पावले आहेत.
साप्ताहिकाच्या ताज्या अंकात वादग्रस्त फ्रेंच लेखक मिचेल हौलेबग यांच्या नव्या सबमिशन या पुस्तकावर लेख होता. माध्यम क्षेत्रावर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण जगातून निषेध करण्यात येत आहे. अमेरिकेतील व्हाईट हाऊसने या हल्ल्याचा निषेध केला आहे, तर ब्रिटिश पंतप्रधान कॅमेरुन यांनी रोगट प्रवृत्तीच्या लोकांनी हा हल्ला केला असे म्हटले आहे.
हल्ला असा झाला
रायफलसह २ बुरखाधारी हल्लेखोर साप्ताहिकाच्या इमारतीत शिरले़ आत जात त्यांनी गोळीबार सुरू केला.
हल्लेखोरांकडे पळविलेली कार होती़ पळून जाताना त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला.
सातत्याने इस्लामची टवाळी
फ्रेंच भाषेत ‘चार्ली हेब्दो’ याचा अर्थ होतो साप्ताहिक चार्ली. दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या या नियतकालिकात प्रामुख्याने व्यंगचित्रे, विनोद आणि टवाळखोर भाषेत वृत्तलिखाण प्रसिद्ध होते.
प्रेषित महंमदाचे रेखाचित्र प्रसिद्ध केल्यावर साप्ताहिक कार्यालयात नोव्हेंबर २००१ मध्ये बॉम्बस्फोट घडविला होता. आताही ताज्या टिष्ट्वटर पोस्टमध्ये दी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा संस्थापक प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याचे व्यंगचित्र टाकण्यात आले होते.
या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी ‘अल्ला हू अकबर’च्या आरोळ््या ठोकल्या.‘आम्ही प्रेषिताच्या अपमानाचा बदला घेतला आहे’, असे ओरडत बुरखाधारी हल्लेखोर पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले
हा अत्यंत निर्घृण आणि भ्याड हल्ला असून, आमचा देश मुक्त विचारांचा असल्याने आम्ही चिंतित आहोत.- होलांद, अध्यक्ष, फ्रान्स