अंतराळवीरांच्या हातून पडलेली बॅग कुठे आहे?; अंतराळातून दिसणारी महाकाय ‘कवटी’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 07:59 AM2023-12-07T07:59:56+5:302023-12-07T08:00:17+5:30

ही टूलबॅग पृथ्वीपासून साधारणपणे ११३ किलोमीटर अंतरावर पोहोचेल, तेव्हा तिचं विघटन व्हायला सुरुवात होईल.

Astronauts on the International Space Station harmlessly lost a tool bag during a spacewalk | अंतराळवीरांच्या हातून पडलेली बॅग कुठे आहे?; अंतराळातून दिसणारी महाकाय ‘कवटी’!

अंतराळवीरांच्या हातून पडलेली बॅग कुठे आहे?; अंतराळातून दिसणारी महाकाय ‘कवटी’!

अंतराळवीरांचं घर कोणतं? अवकाशात गेल्यानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हेच त्यांचं घर. पृथ्वीपासून चारशे किलोमीटर अंतरावर असलेलं हे घरच मग त्यांचं सर्वस्व असतं. इथेच राहणं, खाणं, पिणं आणि कामही इथेच. बऱ्याचदा या घरातून त्यांना बाहेरही पडावं लागतं. अंतराळातील या आपल्या घराचा मेन्टेनन्स सांभाळणं, ते सुव्यवस्थित राखणं हेही अत्यंत महत्त्वाचं काम. त्यासाठी जे स्पेसवॉक त्यांना करावं लागतं, त्याचा कालावधीही काही तासांचा असतो. 

स्पेस स्टेशनमधून बाहेर पडून काही अंतराळवीरांनी २ नोव्हेंबर २०२३ रोजी आत्ता जो शेवटचा स्पेसवॉक केला, त्यावेळी एक घटना घडली. स्पेसडॉटकॉमच्या अहवालानुसार जस्मीन मोघबेली आणि लोरल ओ’हारा स्पेस स्टेशनच्या बाहेर येऊन त्याची दुरुस्ती, मेंटेनन्सचं काम करीत होते. पण या स्पेसवॉकच्या दरम्यान दुरुस्तीसाठीची जी टूलबॅग त्यांच्या हातात होती, ती अचानक निसटली आणि ‘खाली’ पडली! पण ही बॅग खाली पडली म्हणजे कुठे गेली? - तर स्पेस स्टेशनपासून थोड्याच अंतरावर ती अंतराळातच तरंगते आहे. ही टूलबॅग आता अंतराळ कचऱ्याचा एक भाग बनली असली तरी अवकाशप्रेमींसाठी ही एक ‘सुवर्णसंधी’ही आहे. कारण उत्तम टेलिस्कोपच्या मदतीनं पृथ्वीवरून ही टूलबॅग ‘स्पॉट’ करता येऊ शकेल. सध्या तरी ही बॅग स्पेस स्टेशनपासून साधारण चार मिनिटांच्या अंतरावर आहे. ही बॅग पाहण्यासाठी आधी स्पेस स्टेशनला ट्रॅक करावं लागेल. त्यानंतर त्याच्या आसपास ही बॅग दिसू शकेल. 

तज्ज्ञांच्या माहितीनुसार ही टूलबॅग पृथ्वीपासून साधारणपणे ११३ किलोमीटर अंतरावर पोहोचेल, तेव्हा तिचं विघटन व्हायला सुरुवात होईल. स्पेसवॉकसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या अंतराळवीर मेगन क्रिश्चियन यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर ही बॅग अंतराळात पडल्याचं फुटेज शेअर करताना म्हटलं आहे, माऊंट फुजीच्या वर ही बॅग शेवटची पाहायला मिळाली. आत्ता जरी ही टूलबॅग पाहाता येत असली तरी अंतराळात असलेल्या कचऱ्याचाच ती एक भाग बनली आहे. पृथ्वीवर तर कचऱ्याचे ढीग आहेतच, पण अंतराळातही आता कचऱ्यांचे ढीग साचताहेत. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, अंतराळातला हा कचरा वेळीच आवरणं आणि पुन्हा होऊ न देणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर अंतिमत: मानवासाठीच ते अतिशय घातक ठरणार आहे. अर्थातच अंतराळातला हा कचराही मानवानंच तयार केलेला आहे. मानवानं वेळोवेळी जे उपग्रह अवकाशात सोडले, ते निरुपयोगी झाल्यानंतर अंतराळ कचऱ्याचा एक भाग बनले आहेत. अंतराळवीरांच्या हातून आत्ता जशी टूलबॅग निसटली, तशीच घटना २००८मध्येही घडली होती. त्यावेळी अंतराळवीरांच्या हातून एक आवश्यक उपकरण हातून निसटलं होतं आणि ते अंतराळात भरकटलं होतं. 

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाही अंतराळासंदर्भात अनेक चित्तवेधक गोष्टी सर्वसामान्यांसाठी शेअर करीत असते. अंतराळातून आपली पृथ्वी कशी दिसते, याचं आकर्षण जसं सर्वसामान्यांना असतं, त्याचप्रमाणे अंतराळवीरांनाही ते असतं. त्यामुळे नासा आपल्या वेगवेगळ्या टेलिस्कोपच्या मदतीनं अंतराळातली जी छायाचित्रे काढते, तीही नेहमी प्रदर्शित करीत असते. नासानं नुकताच एक सुंदर फोटो शेअर केला आहे, त्यात रात्री पृथ्वी कशी दिसते, ते दिसतं. या फोटोत पृथ्वीचं अनोखं रूप तर पाहायला मिळतंच, त्याशिवाय चमकते ग्रह-तारे आणि तेजस्वी चंद्रही पाहायला मिळतो. या फोटोमुळे अनेकांच्या नजरेचं पारणं फिटलं आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून १४ नोव्हेंबरला हा फोटो घेण्यात आला आहे. एवढंच नाही, या फोटोत अंतराळातून रात्रीच्या वेळी अमेरिकेतील शिकागो आणि डेनवरसारखी शहरं कशी दिसतात, हेही स्पष्टपणे पाहायला मिळू शकतं. ज्या ज्या ठिकाणी उजेडाचे मोठमोठे आणि वेगवेगळ्या आकाराचे पुंजके दिसतात, ती कोणती शहरं आहेत, हेही नासानं त्यात दाखवलं आहे. हे फोटो म्हणजे सर्वसामान्यांसाठी एक जादुई मेजवानीच आहे. एखाद्या ताकदीच्या चित्रकारानं एखादी सुंदर कलाकृती निर्माण करावी आणि आपण देहभान विसरून त्याकडे पाहात राहावं, असे हे सारे फोटो आहेत!

अंतराळातून दिसणारी महाकाय ‘कवटी’! 
नासानं काही दिवसांपूर्वीच अंतराळातला आणखी एक फोटो सर्वसामान्यांसाठी खुला केला होता. एका विशाल अशा ‘कवटी’चा तो फोटो होता. हा फोटो पाहून त्यावेळी अनेक शंकाकुशंका आणि तर्कवितर्क लढवले गेले होते. ही कवटी कोणाची असावी, याविषयीही अंदाज वर्तवले गेले होते. नंतर नासानंच त्याचं स्पष्टीकरण देताना सांगितलं होतं, ही कुठलीही कवटी नसून ज्वालामुखीच्या एका प्रदेशाचं चित्र आहे. त्याचा आकार मात्र हुबेहूब कवटीसारखा दिसत होता!

Web Title: Astronauts on the International Space Station harmlessly lost a tool bag during a spacewalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.