चीननं सैन्य पाठवण्याची धमकी देताच पाकिस्तानला धडकी भरली, शहबाज शरीफ थेट दासूत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 09:40 IST2024-04-02T09:39:20+5:302024-04-02T09:40:41+5:30
यासंदर्भात, आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानात सैन्य पाठविण्याची चीनची इच्छा असल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

चीननं सैन्य पाठवण्याची धमकी देताच पाकिस्तानला धडकी भरली, शहबाज शरीफ थेट दासूत!
गेल्या काही दिवसांपूर्वी खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच चिनी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे चीन जबरदस्त संतापला आहे. जर पाकिस्तान चिनी नागरिकांचे संरक्षण करण्यात असमर्थ असेल तर आम्ही स्वतः करू, अशा शब्दात चीननेपाकिस्तानला सुनावले आहे. यासंदर्भात, आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानात सैन्य पाठविण्याची चीनची इच्छा असल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. यानंतर आता, आपले सरकार पाकिस्तानात काम करणाऱ्या चिनी नागरिकांचे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करेल, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी म्हटले आहे.
चीन नाराज -
खैबर पख्तुनख्वामधील बेशम भागात 26 मार्च रोजी आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेल्या वाहनाच्या सहाय्याने चिनी अभियंत्यांच्या ताफ्याला लक्ष्य केले. या हल्ल्यात पाच चिनी अभियंते आणि त्यांच्या पाकिस्तानी ड्रायव्हरचा मृत्यू झाला. सर्व चिनी नागरिक दासू जलविद्युत प्रकल्पात काम करत होते. चिनी नागरिकांचा एक चमू इस्लामाबादहून दासूकडे जात असताना हा हल्ला झाला. या घटनेच्या चौकशीसाठी पाकिस्तानने एक समितीही स्थापन केली होती. मात्र, त्यावर चीनला विश्वास नव्हता. यामुळे चीनने स्वतःचे एक तपास पथक पाठवले. या पथकाने, पाकिस्तानकडून सुरक्षिततेसंदर्भात राहिलेल्या त्रुटींमुळे दहशतवाद्यांना हा हल्ला करण्याची संधी मिळाली, असा दावा केला आहे.
शाहबाज शरीफ दासूत -
चीनकडून वारंवार होणाऱ्या अपमानानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सोमवारी दासूत पोहोचले आणि तेथील चिनी कामगारांना धीर देण्याचा प्रयत्न केला. उर्जा प्रकल्पात काम करणाऱ्या चिनी नागरिकांसोबत संवाद साधताना शरीफ म्हणाले, 26 मार्चच्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जाईल. तसेच भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होणार नाही, याची काळजी पाकिस्तान सरकार घेईल. एवढेच नाही, तर हा दहशतवादी हल्ला म्हणजे, पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे.