हाॅस्पिटलमधील बेडवर पडल्या पडल्या बायरन खिडकीतून बाहेर आकाशात उडणारी विमानं बघायचा. ती दिसली की त्याला होणाऱ्या वेदना विसरून जायचा. वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत हे असंच सुरू होतं. आज बायरन १५ वर्षांचा आहे आणि सपोर्ट पायलट म्हणून तो आता जगभ्रमंतीला निघाला आहे. ‘पेशंट टू पायलट’ हा अशक्य वाटणारा प्रवास बायरनने दोन वर्षांत करून दाखवला.
जन्माला आल्यानंतर दोनच आठवड्यात बायरनला दवाखान्यात दाखल करावं लागलं. दवाखान्यातला दीर्घकाळचा मुक्काम संपवून घरी आणलं की थोडे दिवस बरे जायचे अन् पुन्हा बायरनच्या शरीरावर पुरळ यायचे. विचित्र थकव्याने तो गळपटायचा. अस्वस्थ व्हायचा. वेदनांनी तळमळायचा. उद्याचा दिवस बायरन बघतो की नाही याचीही खात्री नसायची. बायरनला नक्की काय झालं आहे हे डाॅक्टरांनाही समजत नव्हतं. अनेक अत्याधुनिक चाचण्या आणि तपासण्याअंती मागच्या वर्षी बायरनला क्राॅहन (आतड्यांचा दाह) झाल्याचं निदान झालं अन् त्याच्या आजारावरील उपचारांना योग्य दिशा मिळाली; पण हे सर्व घडण्याच्या आतच बायरनने आपल्या वेदनादायी आयुष्याला एक ध्येय दिलं होतं. बायरनला आवडतं म्हणून त्याच्या आई- बाबांनी त्याला विमानात बसवून आणलं; पण एवढ्यानं काही बायरनचं समाधान झालं नाही. त्याला विमान उडवावंसं वाटू लागलं. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने स्वत: पुढाकार घेऊन विमान उड्डाणाचे धडे देणाऱ्या सेंटरमध्ये नाव नोंदवलं आणि त्याचं प्रशिक्षण सुरू झालं. प्रशिक्षण घेता घेता बायरनच्या महत्त्वाकांक्षा वाढायला लागल्या. त्याच बळावर वयाच्या १४ व्या वर्षी बायरन प्रशिक्षकासोबत सपोर्ट पायलट म्हणून ऑस्ट्रेलिया विमानाने फिरला. हे करणारा बायरन सर्वांत कमी वयाचा ऑस्ट्रेलियन ठरला. या प्रवासात त्याने क्राॅहन या आजाराबद्दलची जाणीव जागृती केली. ऑस्ट्रेलियातील ‘क्वीन्सलॅण्ड चिल्ड्रन्स हाॅस्पिटल’ला आतड्यांशी संबंधित आजारांवर स्वतंत्र उपचार केंद्र सुरू करण्यासाठी आर्थिक मदतही केली. त्यानंतर काही महिन्यांनीच आपण सपोर्ट पायलट म्हणून जगभरात फिरणार हे त्याने प्रसारमाध्यमांसमोर जाहीर करून टाकलं. त्याच्या पालकांनाही बायरनचा हा प्लॅन टीव्हीवरूनच समजला. ९ ऑगस्ट रोजी स्लिंग टीएसआय या चार आसनी सिंगल इंजिन विमानातून सपोर्ट पायलट म्हणून ब्रायन प्रशिक्षक पाॅल डेनेसेस यांच्यासोबत जगाची प्रदक्षिणा करायला निघाला आहे. ७ खंडांतील ३० देशांवरून त्यांचं हे विमान उडणार आहे. ५०,००० कि.मी.चा हा प्रवास दोन महिन्यांनी पूर्ण होणार आहे. बायरनला हा प्रवास त्याच्या पंधराव्या वाढदिवसाच्या आधी पूर्ण करायचा आहे. अलाइस स्पिंग्स या ऑस्ट्रेलियातील शहरापासून सुरू झालेला प्रवास सिंगापूर, श्रीलंका, भारत, मध्य पूर्वेकडील देश, इजिप्त, ग्रीस, लंडन, आइसलंड, ग्रीनलंड, कॅनडा, अमेरिका, हवाईवरून न्यूझीलंडमध्ये संपेल.
बायरनला हा प्रवास कोणताही विश्वविक्रम करण्यासाठी करायचा नाही. त्याला जगभरातील रुग्णांना नव्या उमेदीने जगण्याची वाट दाखवायची आहे. आजाराने जगताना मर्यादा अवश्य येतात; पण त्यावर मात करता येते. हेच तो जगभरातल्या माणसांना सांगतो आहे.