७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:03 IST2025-12-30T11:03:04+5:302025-12-30T11:03:25+5:30
तीन देशांचे बदललेले नागरिकत्व आणि पतीच्या हत्येनंतर शून्यातून उभे केलेले राजकीय साम्राज्य, खालिदा जिया यांचा प्रवास आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन
बांगलादेशच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. शेख हसीना यांच्या कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या जिया यांचा जीवनप्रवास एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हता. भारताशी त्यांचे असलेले घनिष्ठ नाते, तीन देशांचे बदललेले नागरिकत्व आणि पतीच्या हत्येनंतर शून्यातून उभे केलेले राजकीय साम्राज्य, हा त्यांचा प्रवास आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीशी 'रक्ताचं नातं'
खालिदा जिया यांचा जन्म १९४५ मध्ये झाला होता. विशेष म्हणजे, त्यांचा जन्म आजच्या पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात झाला होता. त्यावेळी भारत एकसंध होता आणि बंगालची फाळणी झाली नव्हती. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिनाजपुरला स्थलांतरित झाले, जो भाग पुढे पूर्व पाकिस्तान आणि नंतर बांगलादेश बनला. अशा प्रकारे खालिदा जिया यांनी आपल्या आयुष्यात भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश अशा तीनही देशांचे नागरिकत्व अनुभवले.
पतीच्या हत्येनंतर रणरागिणी बनल्या
खालिदा जिया यांचा विवाह जिया-उर-रहमान यांच्याशी झाला होता. रहमान हे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष होते, पण १९८१ मध्ये एका लष्करी बंडादरम्यान त्यांची हत्या करण्यात आली. पतीच्या निधनानंतर खचून न जाता खालिदा जिया सक्रिय राजकारणात उतरल्या. जनरल हुसैन मुहम्मद इरशाद यांच्या लष्करी राजवटीला आव्हान देण्यासाठी त्यांनी ७ पक्षांची युती उभी केली. ९ वर्षांच्या संघर्षानंतर १९९१ मध्ये त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद!
खालिदा जिया यांचा राजकीय प्रवास काट्याकुट्यांचा होता. १९८३ ते १९९० या सात वर्षांच्या काळात त्यांना तब्बल ७ वेळा ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यांनी १९८६ च्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला आणि लोकशाहीसाठी लढा दिला. त्यांच्याच कार्यकाळात बांगलादेशात संसदीय व्यवस्था लागू करण्यात आली, जी देशासाठी एक महत्त्वाचे वळण ठरली.