दैव बलवत्तर म्हणून..! ऐनवेळी जाम झाली बंदूक; थोडक्यात वाचल्या अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 15:16 IST2022-09-02T15:11:03+5:302022-09-02T15:16:01+5:30
अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टीना फर्नांडीज डी किर्चनर यांच्यावर भररस्त्यात गोळीबाराचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे.

दैव बलवत्तर म्हणून..! ऐनवेळी जाम झाली बंदूक; थोडक्यात वाचल्या अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती
गेल्या महिन्यात जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. असाच प्रकार अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतीसोबत घडला आहे. गुरुवारी एका व्यक्तीने अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टीना फर्नांडीज डी किर्चनर यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बंदुक जाम झाली आणि क्रिस्तीना यांचा जीव वाचला. या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे अर्जेंटिनाचे राजकीय वातावरण तापले आहे.
El video del arma contra @CFKArgentinapic.twitter.com/8j1xpMnPoe
— Lautaro Maislin (@LautaroMaislin) September 2, 2022
राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांनी टीव्हीवर देशाला संबोधित करताना सांगितले की, एका व्यक्तीने उपराष्ट्रपती क्रिस्टिना यांच्याकडे पिस्तूल दाखवून ट्रिगर खेचला. पण, गोळी बंदुकीतून बाहेर आलीच नाही आणि क्रिस्टीना यांचा जीव वाचला. अर्जेंटिनामध्ये लोकशाही परत आल्यापासूनची ही सर्वात गंभीर घटना असल्याचे त्यांनी सांगितले. अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतींवर सध्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. हा हल्ला झाला तेव्हा त्यांचे शेकडो समर्थक त्यांच्या ब्युनोस आयर्स निवासस्थानाबाहेर जमले होते.
आरोपी मूळचा ब्राझीलचा होता
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, क्रिस्तीना फर्नांडीज आपल्या समर्थकांना अभिवादन करत असताना, एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने बंदूक दाखवली. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर 35 वर्षीय ब्राझिलियन वंशाचा आहे. या घटनेनंतर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आणि शस्त्रही जप्त करण्यात आले.
फर्नांडिस डी किर्चनर यांच्यावर अनेक आरोप
2007 ते 2015 दरम्यान दोनदा अर्जेंटिनाच्या अध्यक्ष बनलेल्या किर्चनर यांची फुटीरतावादी राजकारणी म्हणून ओळख आहे. त्यांना 12 वर्षे तुरुंगवास आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस केलेल्या सार्वजनिक करारासाठी निवडणूक न लढवण्याच्या अपात्रतेचा सामना करावा लागला होता. पुढील सार्वत्रिक निवडणुकीत फर्नांडिस डी किर्चनर या अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. उपराष्ट्रपतींच्या हत्येच्या प्रयत्नाचा अनेक देशांच्या प्रमुखांनी निषेध केला आहे.