कोणीही येतो टपली मारून जातो! इराणच्या एअरस्ट्राईकवरून बिलावल भुट्टोंची भारतावर आगपाखड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:38 IST2024-01-19T13:38:13+5:302024-01-19T13:38:29+5:30
भुट्टो यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला मुलाखत दिली आहे. पाकिस्तानने इराणवर जो हल्ला केला तो आमचा हक्क होता, असे ते म्हणाले आहेत.

कोणीही येतो टपली मारून जातो! इराणच्या एअरस्ट्राईकवरून बिलावल भुट्टोंची भारतावर आगपाखड
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारतावर आगपाखड केली आहे. इराणनेपाकिस्तानवर एअरस्ट्राईक केल्यावरून त्यांनी भारताला जबाबदार धरले आहे. कोणत्याही देशावर एअरस्ट्राईक करणे एक ट्रेंड बनत आहे. हे देश आपले स्थानिक विषयांपासून भरकटविण्यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे धोकादायक ट्रेंड फॉलो करत असल्याचा आरोप केला आहे.
भुट्टो यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला मुलाखत दिली आहे. पाकिस्तानने इराणवर जो हल्ला केला तो आमचा हक्क होता. पाकिस्तानवर कोणी हल्ला करण्याचा विचार करू नये यासाठी उचलले गेलेले हे योग्य पाऊल आहे.
पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत आहे आणि इराणने वारंवार तुमच्या भूमीचा वापर होऊ देऊ नये असे सांगितले होते. मात्र पाकिस्तानने याकडे लक्ष न दिल्याने इराणला दहशतवादी ठिकाण्यांवर हवाई हल्ले करावे लागले होते. भारतानेही 2019 मध्ये पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील बालाकोट शहराभोवती बॉम्ब टाकले होते. यानंतर पाकिस्तानवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यावरून भुट्टो यांनी भारतावर आगपाखड केली आहे.
हा एक ट्रेंड सुरू झाला आहे आणि आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करू इच्छितो. भारतात निवडणुका सुरू असताना त्यांनीही तेच केले होते. आजकाल इराणवरही देशांतर्गत दबाव आहे. पण इराणने असे करणे अत्यंत खेदजनक आहे. पाकिस्तान आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड करू शकत नाही हेही आम्ही दाखवून दिले आहे, असे भुट्टो म्हणाले.