अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 08:02 IST2025-12-24T07:59:16+5:302025-12-24T08:02:28+5:30
लिबियाचे सैन्य प्रमुख आणि त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांचे विमान कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
तुर्कीच्या राजधानीतून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. लिबियाचे लष्करी प्रमुख मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांच्या विमानाला तुर्कीमध्ये भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अल-हद्दाद यांच्यासह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अंकारा विमानतळावर एकच खळबळ उडाली असून सुरक्षेच्या कारणास्तव एअरपोर्ट तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, लिबियाचे सैन्य प्रमुख अल-हद्दाद हे एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह तुर्कीच्या अधिकृत दौऱ्यावर होते. मंगळवारी सायंकाळी अंकारा येथील एसेनबोगा विमानतळावरून त्यांनी आपल्या देशाकडे प्रयाण केले. मात्र, उड्डाण केल्यानंतर अवघ्या ४० मिनिटांतच विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर काही वेळातच हे विमान अंकाराजवळील हायमाना जिल्ह्यात कोसळल्याची दुःखद बातमी समोर आली.
तांत्रिक बिघाड की खराब हवामान?
प्राथमिक तपासात या अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड असल्याचे लिबियाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विमान कोसळण्यापूर्वी पायलटने हायमाना जिल्ह्याजवळ 'इमर्जन्सी लँडिंग'चा सिग्नल दिला होता, परंतु खराब हवामानामुळे विमानाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणातच आकाशात आगीचा गोळा दिसला. या अपघातात विमानातील ५ वरिष्ठ अधिकारी आणि ३ क्रू मेंबर्स अशा सर्वांचाच अंत झाला आहे.
मृतांमध्ये कोणाकोणाचा समावेश?
लिबियाचे पंतप्रधान अब्दुल-हमीद दबीबे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून देशाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. या दुर्घटनेत सैन्य प्रमुख अल-हद्दाद यांच्यासोबत अल-फितौरी घ्रैबिल, ब्रिगेडियर जनरल महमूद अल-कतावी, सल्लागार मोहम्मद अल-असावी दियाब आणि लष्करी छायाचित्रकार मोहम्मद उमर अहमद महजूब यांचा मृत्यू झाला आहे.
एअरपोर्ट बंद, विमानं डायव्हर्ट
या भीषण अपघाताची माहिती मिळताच अंकारा विमानतळावरील सर्व उड्डाणे थांबवण्यात आली. अनेक येणारी विमाने इतर शहरांकडे वळवण्यात आली आहेत. तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी स्पष्ट केले की, अपघातग्रस्त 'डसॉल्ट फाल्कन ५०' या खाजगी जेटचा ढिगारा शोधण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
कोण होते अल-हद्दाद?
मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद हे पश्चिम लिबियाचे अत्यंत शक्तिशाली लष्करी कमांडर होते. लिबियामधील विखुरलेल्या लष्करी गटांना एकत्र आणण्यासाठी आणि देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांची भूमिका अत्यंत मोलाची मानली जात होती. त्यांच्या अशा जाण्याने लिबियाच्या राजकारणात आणि सुरक्षेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.