...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:23 IST2025-10-14T16:18:22+5:302025-10-14T16:23:38+5:30
Bipin Joshi Hostage Update: छोट्या शहरात राहणारा बिपिन जोशी शेतीशी संबंधित एका अभ्यास दौऱ्यासाठी इस्रायलला गेला होता. गाझा सीमेजवळ असलेल्या किबुत्ज अलुमिममध्ये तो होता.

...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
Bipin Joshi Killed by Hamas: २०२३ मध्ये बिपिन जोशी इस्रायलला गेला होता. इस्रायलमधील शेतीत केल्या जात असलेल्या नवनव्या प्रयोगाचा अभ्यास करण्यासाठी एका कार्यक्रमांतर्गत तो तिथे पोहोचला. पण, पुढे काय वाढून ठेवलं आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती. २०२३ मध्ये म्हणजे ७३८ दिवसांपूर्वी हमासने ज्या इस्रायली नागिकांना पकडले आणि ओलीस ठेवले, त्यात बिपिनही होता. त्याची सुटका व्हावी त्याची आई शेवटपर्यंत धडपडत राहिली. तिने अमेरिकेकडेही मदत मागितली. जेव्हा ओलिसांना सोडण्याची वेळ आली, तोपर्यंत बिपिन जोशी जगातून गेलेला होता. त्याचा मृतदेहच त्याच्या आईला मिळाला.
इस्रायल आणि हमासमधील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेली गाझा शांती योजना अखेर लागू झाली आहे. इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबले आहे. शस्त्रसंधीनुसार हमासने त्यांच्या कैदेत असलेल्या २० जिवंत नागरिकांना सोडले. तर इस्रायलनेही २०८८ पॅलेस्टिनी नागरिकांना मुक्त केले.
बिपिन जोशीच्या आईच्या डोळ्यात अश्रुंचा महापूर
दोन वर्षांहून अधिक काळापासून हमासच्या कैदेत असलेल्या आपल्या जिवलगांना बघून नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, पण तिकडे दूर नेपाळमध्ये बिपिन जोशीच्या आईच्या आक्रोशाने सगळ्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. हमासने जिवंत ओलिसांसोबत ज्यांचे मृतदेह परत केले, त्यात एक मृतदेह बिपिन जोशीचाही होता.
मुलगा जिवंत परत येईल म्हणून चातकासारखी वाट बघत असलेल्या आईकडे आता निर्जीव बिपिन सोपवला जाणार आहे. मूळचा नेपाळमधील एका शहरातील असलेला बिपिन जोशीचा मृतदेह हमासने इस्रायलच्या लष्कराकडे सोपवला आहे.
बिपिन जोशीचे पार्थिव तेल अवीवमध्ये
नेपाळच्या इस्रायलमधील उच्चायुक्त धन प्रसाद पंडित यांनी सांगितले की, बिपिन जोशीचे पार्थिव सोमवारी तेल अवीवमध्ये आणले गेले. हमासने त्याचा मृतदेह इस्रायली अधिकाऱ्यांकडे सोपवला होता. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते एफी डेफ्रीन यांनी सांगितले की, हमासने बिपिन जोशीसह चार ओलिसांचे मृतदेह इस्रायलला दिले आहेत. बिपिन जोशीच्या पार्थिवावर नेपाळच्या मदतीने इस्रायलमध्येच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्यांच्या अस्थी नेपाळला पाठवल्या जातील.
नेपाळमधील शहरातून निघाला हमासच्या अत्याचाराच्या पिंजऱ्यात अडकला
बिपिन जोशी नेपाळमधील एका छोट्या शहरातील रहिवाशी होता. सप्टेंबर २०२३ मध्ये इस्रायला गेला होता. गाझा सीमेलगत असलेल्या किबुत्ज अलुमिममध्ये कृषी संशोधन आणि अभ्यासासाठी तो गेला होता. त्याच्यासोबत १६ जण होते. इस्रायलमध्ये शेती कशा पद्धतीने केली जाते, हे जाणून घेणे हे या दौऱ्याचे उद्दिष्ट होते.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने दक्षिण इस्रायलवर मोठा हल्ला केला. सायरन वाजणे सुरू झाले आणि हे सगळे विद्यार्थी बॉम्ब शेल्टर होममध्ये लपले. काही वेळानंतर गोळीबार आणि बॉम्ब वर्षाव सुरू झाला. हमासच्या दहशतवाद्यांनी या शेल्टर बॉम्ब फेकले. एक बॉम्ब फुटला आणि अनेक विद्यार्थी जखमी झाले.
बिपिनचा शेवटचा व्हिडीओ अन्...
बिपिन जोशी चपळाई दाखवत त्यांच्या जवळ फेकलेला एक बॉम्ब पकडला आणि दहशतवाद्यांच्या दिशेने फेकला. त्यानंतर त्याला पकडण्यात आले होते. पकडून त्याला गाझामध्ये नेण्यात आले. इस्रायली सैन्याने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता, त्यात बिपिन जोशीला फरफटत गाझातील शिफा हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होते.
बिपिनला हमासच्या दहशतवाद्यांनी पकडल्यानंतर आईने त्याच्या सुटकेसाठी नेपाळ सरकार, इस्रायल सरकार आणि अमेरिकेकडून मदत मागितली. पण, काही मदत मिळाली नाही. दोन वर्ष प्रतिक्षा केल्यानंतर त्याचा मृतदेहच कुटुंबीयांना बघायला मिळाला. २६ ऑक्टोबर रोजी बिपिन जोशी २५ वर्षांचा झाला असता.