"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 00:45 IST2025-10-02T00:43:41+5:302025-10-02T00:45:09+5:30
Donald Trump US Qatar Agreement : ट्रम्प यांची कतारला सुरक्षेची हमी देणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी

"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
Donald Trump US Qatar Agreement : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड सक्रीय झाले आहेत. दोहामध्ये हमास नेत्यांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबद्दल ट्रम्प यांनी आधी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कतारची माफी मागण्यास भाग पाडले. आणि आता ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी कतारच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. आदेशात म्हटले आहे की जर कोणत्याही देशाने कतार किंवा दोहा शहरावर हल्ला केला तर अमेरिका गरज पडल्यास लष्करी कारवाई करेल. इस्रायलच्या अलिकडच्या हवाई हल्ल्यानंतर आणि व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ही करार करण्यात आला.
अमेरिका-कतार दीर्घकालीन मित्र
ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, अमेरिका आणि कतार हे दीर्घकालीन मित्र आहेत. अमेरिकेच्या लष्करी अभ्यासापासून ते प्रादेशिक शांतता प्रयत्नांपर्यंत प्रत्येक गोष्टीत कतारने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हमासला लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने दोहावर केलेल्या हवाई हल्ल्याचा अमेरिका आणि कतार दोघांनीही तीव्र निषेध केला. या कार्यकारी आदेशानंतर काही आठवड्यांनंतर करारावर स्वाक्षरी झाली.
बाहेरील आक्रमणापासून अमेरिका करणार कतारचे संरक्षण
आदेशात असेही म्हटले आहे की, अमेरिका कतारची प्रादेशिक अखंडता आणि सुरक्षितता बाहेरील आक्रमणांपासून वाचवण्यासाठी वचनबद्ध आहे. दोन्ही देशांमधील दशकांपासून सुरू असलेली भागीदारी आणि सुरक्षा सहकार्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प यांच्या आदेशात असेही म्हटले आहे की, अमेरिका कतारवरील कोणताही सशस्त्र हल्ला हा अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आणि शांततेसाठी धोका मानेल. अशा परिस्थितीत, अमेरिका राजकीय, आर्थिक आणि गरज पडल्यास लष्करी कारवाई करेल.
या आदेशात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, अमेरिकेचे युद्ध सचिव, परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक कोणत्याही परकीय हल्ल्याला जलद प्रतिसाद देण्यासाठी कतारसोबत संयुक्त योजना विकसित करत राहतील. शिवाय, परराष्ट्र सचिव इतर मित्र राष्ट्रांच्या सहकार्याने कतारला सुरक्षा देण्यास प्रयत्नशील व कटिबद्ध असतील.