एका देशावर झालेला हल्ला हा दोन्ही देशांवरील आक्रमण; पाकिस्तान, सौदी अरेबियात झाला मोठा संरक्षण करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:29 IST2025-09-19T11:28:48+5:302025-09-19T11:29:55+5:30
कतारमधील हमास नेतृत्वावर इस्रायलने हल्ले केल्यावर काही दिवसांनी हा करार करण्यात आला. कतार अमेरिकेला समर्थन देणारा महत्त्वाचा देश आहे.

एका देशावर झालेला हल्ला हा दोन्ही देशांवरील आक्रमण; पाकिस्तान, सौदी अरेबियात झाला मोठा संरक्षण करार
इस्लामाबाद : पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांनी संरक्षणविषयक एक महत्त्वाचा करार केला आहे. त्याद्वारे एका देशावर झालेला हल्ला हा दोन्ही देशांवरील आक्रमण मानले जाईल, असे या करारात नमूद करण्यात आलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी बुधवारी या करारावर स्वाक्षरी केली, अशी माहिती संयुक्त निवेदनात देण्यात आली.
कतारमधील हमास नेतृत्वावर इस्रायलने हल्ले केल्यावर काही दिवसांनी हा करार करण्यात आला. कतार अमेरिकेला समर्थन देणारा महत्त्वाचा देश आहे. पाकिस्तान व सौदी अरेबियाने संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, हा करार दोन्ही देशांच्या सुरक्षावाढीसाठीचे आणि जागतिक शांततेबद्दल असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. संरक्षण सहकार्य वाढवणे आणि कोणत्याही आक्रमणाचा संयुक्तरीत्या मुकाबला करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे.
संबंध अधिक दृढ होणार
पाकिस्तान-सौदी अरेबियामध्ये गेली आठ दशके घनिष्ठ संबंध आहेत. ते आणखी दृढ करण्यासाठी हा करार करण्यात आला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत लष्करप्रमुख असीम मुनीर व अन्य मंत्रीही उपस्थित आहेत.
भारत सरकार म्हणते...
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी सांगितले की, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये झालेल्या संरक्षण करारामुळे सुरक्षा, प्रादेशिक व जागतिक स्थैर्यावर काय परिणाम होतील याचा भारत अभ्यास करणार आहे. त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया व्यक्त करू.